बाटलीसाठी काही पण करु! सैन्याला हवी होती दारु; म्हणून युद्ध झाले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:19 PM2020-04-29T17:19:14+5:302020-04-29T17:33:46+5:30

जगभरात कोणत्याही कारणावरून युध्द झालं तरी प्रत्येक युध्दात हजारो किंवा लाखों सैनिकांना आपला जीव गमवावा लागतो. अशाच एका युध्दाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण या युध्दाचं कारणं वाचून तुम्हाला नक्की हसायला येईल . फक्त एका चुकीमुळे सैनिक आपापसात युध्द करत होते. या युध्दाचं सगळ्यात मोठं कारण दारू न मिळणं हे होतं.

या युध्दाला बॅटल ऑफ कॅरनसिब्स या नावाने ओळखलं जातं. जगातील हास्यस्पद युध्दात हे युद्धाची गणना होते. ही घटना १७८८ मधील आहे.

ज्यावेळी १ लाख ऑस्ट्रियाई सैनिक कॅरनसीब्स शहरावर आक्रमण करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ऑस्ट्रिया आणि तुर्की या दोन देशांमध्ये युध्द सुरू होतं. सैनिकांनी कॅरनसीब्स या शहराला चारही बाजूंनी घेरलं होतं.

त्यांना नदीपलिकडे तुर्की सेना दिसली नाही. पण नदीच्या पलिकडे त्यांना रोमन लोकांचा एक शिबिर दिसलं. जेव्हा घोड्यावर स्वार असलेले ऑस्ट्रियाई सैनिक तिथे पोहोचले तेव्हा रोमन लोकांनी त्यांना दारू पिण्यासाठी निमंत्रण दिलं.

आधीच युध्द केल्यामुळे ऑस्ट्रियाई सैनिक थकलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते नदीकाठी रोमन लोकांसोबत मद्याचा आनंद घेत निवांत बसले.

याच दरम्यान त्या ठिकाणी काही ऑस्ट्रियाई सैनिक पायी चालत तिथपर्यंत पोहोचले. घोड्यावर स्वार असलेल्या सैनिकांकडून त्यांनी सुद्धा दारूची मागणी केली. पण या सैनिकांना पायी चालत आलेल्या सैनिकांना दारू पिण्यासाठी देण्यास नकार दिला. यामुळे ते सैनिक भडकले आणि घोड्यावर असलेल्या सैनिकांशी लढायला सुरूवात केली.

अशातच एका सैनिकाने गोळीबार केला. गोळीचा आवाज ऐकून नदीच्या त्या बाजूला जे सैनिक आराम करत होते. त्यांना वाटलं की तुर्की सैनिकांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे ते उठून तुर्क्स-तुर्क्स असे ओरडत नदीपलिकडच्या बाजूला गोळ्या चालवायला लागले. दोन्ही बाजूच्या सैनिकांना अंदाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली. यामुळे स्वतः चे सैनिक नकळतपणे मारले गेले.

एकिकडे ऑस्ट्रियाई सैनिकांचे नेतृत्व करत असलेल्या अधिकारी वर्गाने सैनिकांना थांबण्याचे आदेश दिले. पण सैनिकांना हॉल्टचा अर्थ न समजल्यामुळे त्यांनी लढाई सुरूच ठेवली. ऑस्ट्रियाई सैनिकांना अंधारात आपलेच सैनिक तुर्की असल्याचं वाटल्यामुळे त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. असं म्हणतात की एका ऑस्ट्रियाई सैनिकाने तोफ सुद्धा चालवली होती.

अशाप्रकारे ऑस्ट्रियाई सैनिकांच्या एका चुकीमुळे स्वतःच्या देशातील सैनिकांना मृत्यूचा सामना करावा लागला. या युध्दात हजारोच्या संख्येने बळी गेले.