Budget news 2021: मामीनं दिलेल्या लाल कापडात निर्मला सीतारामन यांनी सादर केलं होतं पहिलं बजेट; हळदी कुंकवानं लिहिलं होतं शुभ लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 11:53 AM2021-02-01T11:53:48+5:302021-02-01T12:29:35+5:30

२०२१ (Budget 2021) या वर्षांचा बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. निर्मला सीतारामण यांनी सकाळी ११ वाजता बजेट सादर करायला सुरूवात केली आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा फायदा होणार, काय स्वस्त काय महाग याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

कोरोनामुळे डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी वित्तमंत्री कोणती पाऊलं उचलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. स्वातंत्र्य मिळल्यानंतर वित्तमंत्र्यांकडून सुटकेसमध्ये बजेट सादर करायला सुरूवात झाली. 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच लाल रंगाच्या बॅगेत बजेट सादर केले होते.

२०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी आपलं पहिलं बजेट सादर करायला पोहोचल्या. तेव्हा त्यांच्या हातात सुटकेसऐवजी लाल रंगाची बॅग होती. या लाल कापडानं सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होते.

सुटकेस किंवा ब्रीफकेसऐवजी या लाल कापडाला देशातील वही खाते मानलं गेलं होतं. ज्यावेळी बॅगवरून खूप चर्चा झाली तेव्हा निर्मला सीतारामन यांनी लोकांना याचे कारण देखिल सांगितले होते.

निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, ''२०१९ ला सुटकेस स्वतःबरोबर घेतली नाही कारण हे सुटकेसवालं सरकार नाही.''

लोकसभेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं होतं की, बजेट हे सुटकेसमध्ये आणण्यात आलं नव्हतं. निर्मला सीतारामन या लाल रंगाच्या कापडाच्या बॅगसह दिसून आल्या होत्या. या कापडावर अशोक चिन्ह बनले होते. यासह एका सोनेरी रंगाच्या फितीत बजेट होते.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना अनेक प्रश्नोत्तरांचा सामना करावा लागला होता. यावेळी यांनी ब्रीफकेस किंवा सुटकेस पसंत नसल्याचे सांगितले होते. ही इंग्रजांची देण असून आपल्या देशात बॅग जास्त चालतात असंही त्या म्हणाल्या होत्या.

विशेष म्हणजे ज्या लाल कापडात त्यांनी बजेट सादर केले होते. हे कापड निर्मला यांना त्यांच्या मामीनं गिफ्ट केले होते. त्यावर हळदी, कुंकू आणि चंदनानं शुभ लाभ लिहिण्यात आलं होतं.

दरम्यान भारतात प्रत्येक गोष्टीत वेगवेगळी परंपरा दिसून येते. हिशोबासाठी तसंच कोणत्याही आर्थिक कामासाठी लाल रंगाच्या वह्यांचा उपयोग केला जातो. अनेक दुकानांमध्ये हिशोबाच्या वह्या लाल रंगाच्या असतात. याचाच आधार घेत निर्मला यांनी लाल कापडातील बॅगेत बजेट सादर केलं होतं.