Bulldozer History: 99 वर्षांपूर्वी लागला होता बुलडोझरचा शोध; तोडफोड नाही, तर 'या' कामासाठी व्हायचा वापर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 09:41 AM2022-04-21T09:41:14+5:302022-04-21T09:54:38+5:30

History of Bulldozer: बुलडोझरचा शोध जेम्स कमिंग्ज आणि जे.जे. अर्ल मॅक्लिओड यांनी 1923 मध्ये लावला. सुरुवातीला याचा वापर दुसऱ्या महत्वाच्या कामासाठी व्हायचा.

History of Bulldozer: सध्या भारतात बुलडोझरची मोठ्या प्रमाणत होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या संपत्तीवर बुलझोझर चढवण्याची कारवाई सुरू झाली. त्यानंतर आता अनेक राज्यात अशाप्रकारची कारवाई केली जात आहे.

नुकतीच दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारातील आरोपींच्या संपत्तीवर बुलडोझर चढवण्यात आला. या प्रकरणाने राजकारण तापले आहे. पण, तुम्ही कधी विचार केला का की, या बुलडोझरचा शोध कधी आणि कोणी लावला? याचे काम फक्त घर पाडण्यापुरतेच आहे का? चला तर मग जाणून घेऊन या बुलडोझरच्या इतिहासाबाबत.

बुलडोझरचा शोध ही अभियांत्रिकी जगतातील एक महत्त्वाची घटना होती. बुलडोझरचा शोध मूळात शेतकऱ्यांच्या कामासाठी लागला होता, पण कालांतराने त्याचा वापर बदलत राहिला.

जगातील पहिल्या बुलडोझरचा शोध जेम्स कमिंग्ज आणि जे.जे. अर्ल मॅक्लिओड यांनी 1923 मध्ये मोरोविल, कॅन्सस येथे लावला. त्यांनी सुरुवातीला एवढी मोठी ब्लेड बनवली होती.

सुरुवातीला याचे काम फक्त माती ढकलण्यापूरतेच होते. त्या काळात या मोठ्या ब्लेडला ट्रॅक्टरला जोडून चालवले जात असे. त्यावेळी शेतात नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात असे.

या "अटॅचमेंट फॉर ट्रॅक्टर्स"साठी त्याचे पेटंट 1925 मध्ये मंजूर झाले. बुलडोझरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे मोठ्या आकाराचे पुढचे ब्लेड आणि एक शक्तिशाली इंजिन, जे जड वस्तूंना ढकलण्याचे काम करते.

आजच्या काळात बुलडोझरमध्ये रबरी चाके वापरली जात असली तरी पूर्वी त्यात साखळीसारख्या चाकांचा(चेन ट्रोड) वापर होत असे. या चाकांच्या सहाय्याने बुलडोझर खडबडीत रस्त्यावरही सहज चालू शकत असे.

आताही अनेक ठिकाणी अशाप्रकारचे बुलडोझर पाहायला मिळतात. पूर्वी बुलडोझरची ही शक्तिशाली ब्लेड घोडा किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच हलवली जात असे, पण नंतर त्यात हायड्रोलिक्स जोडल्यानंतर याचा वापर विविध कामात होऊ लागला.

बुलडोझरचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात घाण, दगड, मोडतोड करण्यासाठी केला जातो. खाण, शेती आणि बांधकाम साइट्समध्ये काम करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.