Buy for just Rs.1; Shoes, clothes, books, furniture and more from RRR Centre Chandigarh
कौतुकास्पद! फक्त १ रुपयांत खरेदी करा; शूज, कपडे, पुस्तके, फर्निचर अन् बरेच काही... By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 07:22 PM2023-06-13T19:22:47+5:302023-06-13T19:34:58+5:30Join usJoin usNext सध्याच्या महागाईच्या जगात प्रत्येक वस्तूच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईत तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. परंतु तुम्ही असं दुकान पाहिलंय का? जिथे शूज, कपडे, पुस्तके, क्रॉकरी आणि अगदी फर्निचर अशा सर्व वस्तू फक्त एक रुपयात मिळतात. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. चंदीगडमध्ये असे एक दुकान उघडले आहे, जिथे या सर्व गोष्टी फक्त एक रुपयात मिळतात. चंदीगड महानगरपालिकेने अशी २ विशेष दुकाने उघडली आहेत. पहिले स्टोअर विकास नगरच्या कम्युनिटी सेंटरमध्ये आणि दुसरे मलोयाच्या कम्युनिटी सेंटरमध्ये सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही दुकानांमध्ये लोकांनी दान केलेल्या वस्तूंची गरज असलेल्यांना केवळ एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरातील सर्व ३५ वॉर्डांमध्ये 'रिड्युस रीयुज रिसायकल' स्टोअर्स उघडल्यानंतर प्रथम हा माल लोकांकडून गोळा करण्यात आला आणि त्यानंतर जमा झालेल्या मालातील चांगल्या दर्जाचा माल आता एक रुपयाला विकला जात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या दोन्ही कम्युनिटी सेंटरमध्ये या वस्तू घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होत आहे. येथे सर्व वर्गातील लोकांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत, महिला, पुरुष आणि मुलांसाठी कपड्यांमधील स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. ५ जूनपर्यंत चालवण्यात आलेल्या रिड्यूस, रिसायकल अँड रियुज (आरआरआर) च्या यशानंतर महापालिकेने चंदीगड शहरात कायमस्वरूपी RRR केंद्र सुरू केले आहे. आता लोक कधीही येथे येऊ शकतात आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या वस्तू दान करू शकतात. येथे लोक जुने कपडे, पुस्तके, स्टेशनरी, पादत्राणे, खेळाच्या वस्तू, लाकडी वस्तू, फर्निचर, चामड्याच्या/नायलॉनच्या पिशव्या, शाळेच्या पिशव्या, प्लास्टिकचे बॉक्स, सजावटीच्या वस्तू, खेळणी, खेळ, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि धातूच्या वस्तू महापालिकेला थेट दान करू शकतात. याठिकाणी जो काही माल जमा होईल, तो बचतगटाच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवला जाईल. हे आरआरआर केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. चंदीगडच्या आयुक्त आनंदिता मित्रा यांनी सांगितले की, घरांमधून असे बरेच साहित्य बाहेर टाकले जाते, जे इतर कोणी वापरू शकते, परंतु पर्याय नसल्यामुळे काहीजण ते कचऱ्याच्या गाडीला देतात. महापालिकेने ही समस्या लक्षात घेऊन रिड्यूस, रिसायकल आणि रियुज (आरआरआर) केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ज्या वस्तू इतरांना वापरता येतील अशाच वस्तू दान कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. हा माल व्यवस्थित आणि स्वच्छ करून लोकांपर्यंत पोहोचवला जाईल.