Corona Vaccination: भन्नाट ऑफर! कोरोना लसीचा १ डोस घ्या अन् मिळवा मोफत बिअर, ७ हजार रुपये अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 01:38 PM 2021-05-19T13:38:35+5:30 2021-05-19T13:43:52+5:30
Corona Vaccination: कोरोनापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक देश सध्या लसीकरण मोहिमेवर भर देताना दिसत आहेत. काही ठिकाणी नोंदणी करूनही लस मिळत नाहीत तर अनेक ठिकाणी लस असून ती घेण्यासाठी नागरिक तयार नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसला असून याठिकाणी रुग्णसंख्या लाखोंच्या घरात पोहचली आहे. यातच जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे.
१ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस मिळणार आहे. परंतु लसीचा अभाव असल्याने अनेकांना नोंदणी करूनही लसीकरणाची वाट पाहावी लागत आहे. परंतु जगात असे काही देश आहेत जे लसीकरण करण्यासाठी लोकांना विविध आणि भन्नाट ऑफर्स देत आहेत.
एकाठिकाणी लस घेण्यासाठी बिअर किंवा १०० डॉलर सारखे गिफ्ट देण्यात येत आहे. ही ऑफर सध्या अमेरिकेत लोकांसाठी देण्यात येत आहे. द ग्रेट अमेरिका कोरोना महामारीच्या रुग्णांमध्ये जगात १ नंबरला आहे. परंतु लसीकरण अभियान वेगात करण्यासाठी या देशाने सुपर पॉवरचा वापर केला आहे.
देशातील विविध राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर्स सुरू केल्या आहेत. यावेळी अमेरिकेच्या रस्त्यांवर पुन्हा झगमगाट सुरू झालाय. रेस्टॉरंट आणि जीम पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
लस घेणाऱ्यांसाठी ऑफर देण्याची सुरूवात वॉश्गिंटनच्या मेयर मुरील बोसर यांनी मोफत बिअर देण्याची घोषणा केल्यानंतर झाली. यासाठी त्यांनी २१ वर्षावरील लोकांना कोविड लस घेतल्यास मोफत बिअर देणार असल्याचं स्पष्ट केले. त्यानंतर अनेकांनी विविध प्रलोभनं दाखवण्यास सुरूवात केली.
अमेरिकेतील बायडेन सरकार लवकरात लवकर देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयोग तेथील प्रशासन करत आहे. ही ऑफर आता फक्त बिअर पुरती मर्यादित राहिली नाही.
मैरीलँड सरकार कर्मचाऱ्यांना वॅक्सिन घेतल्यानंतर १०० डॉलर(७ हजार रुपये) देत आहे. तर डेट्रॉयटमध्ये फ्री राइडसोबत ५० डॉलर देण्यात येत आहे. न्यू जर्सीत डोस घेतल्यास एक बिअर कॅन आणि मिशिगनमध्ये मारिजुआना म्हणजे गांजा मोफत देणार असल्याचं सांगितलं आहे.
मैरीलँडचे राज्यपाल लॉरेस जोसेफ म्हणाले की, आमचं लक्ष १०० टक्के लसीकरण आहे. रिपोर्टंसनुसार जे सेंटरला येऊन लस घेऊ शकत नाहीत त्यांना जिथे असाल तिथे मोफत लस दिली जाणार आहे. त्यासोबत अमेरिकेतील अनेक कंपन्यांमध्ये लस घेतल्यानंतर २ दिवसांची सुट्टीही देण्यात येत आहे.
१०० टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यास त्या कंपनीला करातून सवलत देणार असल्याचंही जाहीर केले आहे. फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियामध्ये अनेक कंपन्यांनी लस घेण्यासाठी बोनस जाहीर केला आहे. या सर्व ऑफर १८ वर्षाखालील कोणासाठीही लागू नसणार आहे.
लसीकरण केंद्रांवर लहान मुलांसाठी नॉन अल्कोहोलिक बिअर दिल्या जात आहेत. अमेरिकेत या ऑफर्समुळे लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. दरम्यान काही जणांनी सरकार देत असलेल्या अशा ऑफर्सना विरोध करत आहेत.
प्रलोभन देण्यापेक्षा सरकारने लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचे आहे. शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निरोगी राहण्याचे मेसेज व्हायरल केले पाहिजेत. प्रलोभन म्हणून मोफत बिअर, फ्री राइड देऊन आपलं काम संपतं असं नाही असं विरोध करणाऱ्यांचे म्हणणं आहे.