Coronavirus: भावी पत्नीला पाहायला गेला डॉक्टर; लॉकडाऊनमुळे ‘तिच्या’ घरीच अडकला, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:46 PM2020-04-23T14:46:58+5:302020-04-23T14:51:33+5:30

संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. भारतातही ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व व्यवहार आणि कार्यक्रम ठप्प आहेत.

देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर जोधपूर येथील डॉक्टर आपल्या भावी पत्नीला पाहायला बीकानेर येथे गेला अन् तिथेच अडकला. वाढत असलेल्या लॉकडाऊनमुळे कुटुंबाची चिंतादेखील वाढली. जावायाला लग्न न करता घरात किती काळ घरात ठेवायचं? असा प्रश्न निर्माण झाला. अखेर 30 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाचं आणि मुलीचं लग्न लावून दिलं.

या अजब लग्नाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. जोधपूरमध्ये राहणारे आणि अहमदाबादमध्ये काम करणारे डॉक्टर विवेक मेहता यांचा साखरपुडा बीकानेर येथील पूजा चोपडा हिच्याशी झाला होता.

विवेक २१ मार्च रोजी भावी पत्नी पूजाला भेटण्यासाठी बीकानेरच्या गंगाशहर येथे पोहचला. लॉकडाऊनमुळे दुसऱ्या दिवसापासून रेल्वे सेवा बंद झाली. त्यामुळे अहमदाबादला जाणं विवेकसाठी कठीण झालं. त्यामुळे मजबुरीने त्यांना सासरवाडीत थांबावे लागले.

१५ एप्रिल ते ३ मे या कालावधीत लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढवण्यात आला तेव्हा पूजाच्या वडिलांनी बीकानेरमधील गंगहरच्या जैन समाजाच्या अध्यक्षांना आपली समस्या सांगितली, परंतु लॉकडाऊनमुळे डॉ. विवेक यांचे कुटुंब अहमदाबादहून येथे येऊ शकले नाही. या लॉकडाऊन दरम्यान कोर्ट मॅरेज करणेही शक्य नव्हते.

दुसरीकडे विवेकनेसुद्धा विचार केला की तो किती दिवस सासरी राहणार, परिस्थिती विचित्र बनली होती. शेवटी, दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने ३० दिवस सासरी राहिल्यानंतर, सोमवारी डॉ. विवेक आणि पूजा विवाह बंधनात अडकले.

तथापि, विवेकचे आई-वडील, भाऊ व बहिणी लग्नाला येऊ शकले नाहीत. वधूच्या कुटुंबाच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडला. लॉकडाऊनमुळे डॉ. विवेक यांच्या कुटुंबीय आणि मित्रांनी व्हिडिओ कॉलवरून हे लग्न पाहिले. फॅशन डिझायनर पूजाने व्हिडिओ कॉलद्वारे सासू आणि सासरे यांचे आशीर्वादही घेतले.

विवेकने सांगितले की, लग्नाआधी आम्ही घरातचं प्रीवेडिंग शूटही केलं. आता लॉकडाऊन संपल्यानंतर पूजा आणि मी घरी जाऊ, आता सध्या आम्ही गंगाशहर येथेच राहत आहोत.