25 दिवसांपासून समुद्र प्रवासावर गेलं होतं कपल, एका बेटावर पोहोचले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:18 PM2020-04-23T12:18:14+5:302020-04-23T12:33:30+5:30

दोघांनी त्यांचा प्रवास फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कॅनरी आयलंडपासून सुरू केला. कॅनरी आयलंड उत्तर-पश्चिम अटलांटिक महासागरात आहे.

जगातले कित्येक देश हे कोरोना व्हायरसने हैराण झाले असताना एक कपल समुद्र प्रवासावर होतं. ते जेव्हा त्यांचा प्रवास संपवून एका किनाऱ्यावर थांबले तेव्हा त्यांना हे ऐकून धक्का बसला की, जग हे कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकलं आहे.

झालं असं की, ब्रिटनच्या मॅनचेस्टरच्या रयान ओसबोर्नला पत्नी एलेनासोबत जगाची सफर करायची होती. यासाठी रयान पैसे जमा केले. नंतर दोघांनी नोकरी सोडली आणि एक बोट खरेदी केली. कारण त्यांना लांब पल्ल्याचा समुद्र प्रवास करायचा होता.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांनी त्यांचा प्रवास फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कॅनरी आयलंडपासून सुरू केला. कॅनरी आयलंड उत्तर-पश्चिम अटलांटिक महासागरात आहे.

इथूनच रयान आणि एलेनाने प्रवासाची सुरूवात केली होती. त्यांना ब्राझिलच्या उत्तरेतील सेंट विंसेंट द्वीपावर जायचं होतं.

रयान आणि एलेनाने घरी सांगितले होते की, त्यांना सुट्टी एन्जॉय करताना कोणतीही वाईट बातमी दिली जाऊ नये. त्यामुळे कुणीही त्यांना कोरोना व्हायरसच्या थैमानाबाबत सांगितले नाही. 25 दिवसांनंतर जेव्हा ते सेंट विंसेंट बेटावर पोहोचले तेव्हा जगाची स्थिती वाचून हैराण झाले.

जेव्हा ते सेंट विंसेंट बेटावर पोहोचले तेव्हा त्यांना समजले की, या कॅरेबियन बेटाच्या सीमा सील केल्या आहेत. क्रूज शिपच्या हजारो प्रवाशांना देखील समुद्रातच सोडण्यात आलं आहे. जेणेकरून त्यात कुणी संक्रमित असेल तर इतरांना संक्रमण होऊ नये. (Image Credit : planetware.com)

एलेना आणि रयानने ब्लॉग सेलिंग किटीवेकमधे सांगितले की, फेब्रुवारीमधे आम्ही ऐकलं होतं की, चीनमधे एक व्हायरस होता. पण त्यानंतर 25 दिवसांनी आम्हाला प्रवास संपल्यावर त्याबाबत पूर्ण माहिती मिळाली. आम्हाला समजले की, कोरोना व्हायरसने जगाला हादरवून सोडलं आहे.

रयान म्हणाला की, जेव्हा आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा समजलं की, हा व्हायरस अजूनही नष्ट झालेला नाही. कॅरेबियन बेटावर पोहचण्यास अपयशी ठरल्यावर दोघेही बोटने ग्रेनाडाकडे निघाले होते. पण त्यांनी पुन्हा एक प्रयत्न केला.

दोघांना आधी सेंट विंसेंटमधे जाण्याची परवानगी मिळाली नाही. पण जेव्हा रयानने सांगितले की, आम्ही 25 दिवसांपासून समुद्रात आहोत आणि त्यांची जीपीएस हिस्ट्री दाखवली तेव्हा त्यांना सेंट विंसेंटमधे जाण्याची परवानगी मिळाली.