पावसाळ्यात येणाऱ्या कपड्यांच्या दुर्गंधीमुळे लाजिरवाणे वाटते? करा 'हे' सोपे उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 04:46 PM 2021-07-23T16:46:00+5:30 2021-07-23T17:11:13+5:30
पावसाळ्यात वेगवेगळ्या समस्याही डोकं वर काढू लागतात. वेगवेगळ्या समस्यांमध्ये धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या सगळ्यांसाठीच फार डोकेदुखीची ठरते. याने होतं असं की, तुम्हालाही दुर्गंधीचा त्रास होतो आणि तुमच्या सोबतच इतरांनाही त्रास होतो. अनेकांना ही समस्या कशी दूर करायची हे माहीत नसतं. त्यामुळे आम्ही काही टीप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पावसाळ्यात दुर्गंधी येणारे कपडे बाहेर घालून जाणंही अशक्य असतं. दमट वातावरणात (Humid Environment) कपड्यांना लवकर वास येऊ लागतो.
अशा कपड्यांमध्ये बॅक्टेरियाही (Bacteria) वाढतो. त्यामुळे स्किन इनफेक्शनचा (Skin Infections) धोकाही वाढतो.
पावसाळ्यात कपडे लवकर वाळणे मुश्कील असते त्यामुळे अशावेळी कपडे धुतल्यानंतर मोकळ्या आणि हवेशीर जागेत वाळत घाला. पंख्याच्या हवेवरही तुम्ही कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.
अनेकदा पावसाळ्यात घरात एकप्रकारचं दमट वातावरण निर्माण होतं. त्यामुळे कपड्यांनाही एक वेगळाच वास यायला लागतो. अशावेळी धुतलेले कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा मोकळ्या हवेत ठेवा.
पावसाळ्या उन कमी पडतं त्यामुळे सुकायला घातलेल्या कपड्यांचा वास यायला लागतो. अशात कपडे धुतल्यानंतर त्यातील पाणी चांगल्याप्रकारे पिळायला हवं.
दमट हवेने ओल्या कपड्यांना दुर्गंध येऊ लागते. अशा परिस्थितीत कपडे धुवताना लिंबाचा रस वापरा. यामुळे कपड्यांचा दुर्गंध निघून जाईल.
पावसात भिजलेले किंवा वापरलेले कपडे जास्त काळ ठेऊ नका. भिजलेले कपडे लगेच धुवून टाका.
धुतलेल्या कपड्यांमध्ये आताही वास येत असेल तर ते कपडे वापरण्याआधी एकदा इस्त्री करा किंवा रात्रीच त्या कपड्यांना इस्त्री करुन फॅनच्या हवेखाली ठेवा. इस्त्री केल्यामुळे कपड्यांचा वास पूर्णपणे निघून जातो.
कपडे सुकवण्यासाठी न्यूज पेपरचा वापर करा. हॅंगरला लटकवलेल्या कपड्यांखाली न्यूज पेपर ठेवा. पेपर पाणी शोषून घेतो.
बेकिंग सोडा वापरून पावसाळ्याच्या दिवसांत धुतलेल्या कपड्यांना येणारी दुर्गंध दूर करता येते. याकरता कपडे धुवताना डिटर्जंट बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर वापरा. लगेचच फरक दिसेल.