'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 03:57 PM2021-09-09T15:57:48+5:302021-09-09T16:04:47+5:30

Indonesian Tribe Strange Ritual: मृत व्यक्तीचा आत्मा घरातच राहतो, असा या जमातीतील लोकांचा विश्वास आहे.

जकार्ता: तुम्ही जगभरातील अनेक विचित्र परंपरांबद्दल ऐकले असेल. पण इंडोनेशियामध्ये असा एक समाज आहे, ज्या समाजाच्या परंपरेबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

या समाजामधील लोक त्यांच्या समाजातील मृत लोकांना जमिनीत पुरत किंवा जाळत ​​नाहीत. तर, मृतदेहाला कपड्यात गुंडाळून शवपेटीत बंद करतात आणि त्यांना घरात ठेवतात. तसेच, वर्षातून एका विशेष दिवशी पुन्हा तो मृतदेह बाहेर काढतात.

द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, मृतदेहांना बाहेर काढणाऱ्या या जमातीचे नाव तोजारा आहे. हे लोक इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी येथे राहतात.

या जमातीची लोकसंख्या सुमारे 10 लाख आहे. मृतदेहांना बाहेर काढल्यामुळे नशिब चमकतं, असा या जमतीमधील लोकांचा समज आहे.

तोजारा जमात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हा सण साजरा करते. या दरम्यान, मृत व्यक्तींना शवपेटीतून बाहेर काढले जाते आणि नवीन कपडे घातले जातात.

त्यांना सजवून जेवण दिले जाते आणि नंतर, सिगारेट आणि इतर गोष्टी देखील मृतांना अर्पण केल्या जातात. काही लोक या वेळी मृतांसोबत फोटोही काढतात.

तोजारा जमातीच्या लोकांचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतरही आत्मा त्याच्या घरात राहतो, म्हणून त्याला अन्न, सिगारेट, पाणी आणि कपडे दिले जातात.

मृत्यूनंतर, मृतदेह एका विशेष घरात ठेवला जातो, ज्याला टोंगकोनन म्हणतात. मृतदेह शवपेटीत ठेवताना, तोजारा जमातीचे लोक प्रार्थना करतात आणि तोजारा भाषेत गाणी गातात.