हिमनदीमधून येतंय रक्त! वैज्ञानिकांच्या संशोधनात हैराण करणारी माहिती समोर, यामागचं कारण काय? By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 01:34 PM 2021-06-08T13:34:55+5:30 2021-06-08T13:40:01+5:30
संपूर्णपणे बर्फानं आच्छादलेल्या ग्लेशिअरवर (हिमनदी) अचानक लाल रंगाचा मोठा डाग दिसून आल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मग त्यावर वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केलं. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैज्ञानिक भाषेत हिमनदीवरील लाल रंगाच्या मोठ्या डागाला 'ग्लेशिअर ब्लड' असं संबोधलं जातं. संपूर्णपणे शुभ्र रंगानं रंगलेल्या भागावर असं अचानक रक्तानं माखलेल्या रंगाचा डाग दिसल्यानं संशोधक देखील हैराण झाले आहेत. यामागे एका रहस्यमय प्राण्याचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगांमधील हिमनद्यांवर संशोधन करण्याचा एक प्रकल्प वैज्ञानिकांनी हाती घेतला आहे. यात ३२८० फूटांपासून ते ९,८४२ फूट उंचीवर गोठलेल्या हिमनद्यांमध्ये दिसून येणाऱ्या रक्तासारख्या लाल रंगाच्या द्रव्यावर संशोधन करत आहेत. यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका जलचरामुळे हा भाग लालसर होत असल्याचं सांगितलं जात आहे.
हिमनद्यांवरील लाल रंगाचं संशोधन करणाऱ्या प्रकल्पाचे समन्वयक अॅरिक मार्शल यांनी सांगितलं की एका खास प्रकारच्या मायक्रोएल्गीमुळे (जलचर) हिमनद्यांमध्ये लाल रंग दिसून येत आहे. पाण्यात राहणाऱ्या या मायक्रोएल्गीवर पर्यावरणीय बदलांचा परिणाम होत असतो आणि त्यामुळेच त्या अशा प्रकारचा लाल रंग सोडतात असं मार्शल यांनी सांगितलं.
अॅरिक मार्शल हे फ्रान्सचे लॅबरॉटरी ऑफ सेल्युलर अँड प्लांट फिजिओलॉजीचे संचालक देखील आहेत. एल्जी सजीव समुद्रतळ आणि नद्यांमध्येही आढळतो याची नागरिकांना कल्पना नाही. मायक्रोएल्गी बर्फ आणि हवेतील कणांमुळे हिमनद्यांपर्यंत पोहोचली. जेव्हा आमची टीम याठिकाणी पोहोचली तेव्हा येथील संपूर्ण परिसर लाल रंगानं व्यापलेला दिसला. मायक्रोएल्गीवर पर्यावरण बदल आणि प्रदुषणाचा परिणाम होत असल्यानं अॅलर्जी निर्माण होऊन ते लाल रंग मागे सोडतात त्यामुळे हा संपूर्ण परिसर लाल रंगानं व्यापला आहे, असं मार्शन यांनी सांगितलं.
मायक्रोएल्गी अतिशय सूक्ष्म स्वरुपाचे असतात पण ते जेव्हा एका ठिकाणी कळपानं जमा होतात तेव्हा त्यांचं अस्तित्व जाणवू लागतं. त्यांचं प्रमाण आता खूप मोठ्या प्रमाणात आल्प्समध्ये वाढू लागलं आहे.
फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगामधील हिमनद्यांना लाल रंगात रंगणाऱ्या एल्गी खरंतर तांत्रिकदृष्ट्या हिरव्या रंगाच्या असतात. पण त्यांच्यात काही खास पद्धतीच्या क्लोरोफिल असतात की जे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पूर्ण करतात. क्लोरोफिलसोबतच कॅरोटिनॉयड्सच्या अस्तित्वामुळे लाल रंगाचे पिगमेंट तयार होतात.
जेव्हा एल्गी मोठ्या प्रमाणात वाढतात तेव्हा आजूबाजूचा परिसर लाल किंवा नारंगी रंगाचा दिसू लागतो. त्यांच्यातील कॅरोटिनॉयड्सच्या अस्तित्वामुळेच असं होतं आणि जणू रक्ताचा सडा पडावा असं ते चित्र दिसून येतं, असं मार्शल यांनी सांगितलं. अशाप्रकारचे 'ब्लड ग्लेशिअर' मार्शल यांनी २०१९ साली वसंत ऋतूतही पाहिले होते. तेव्हा कित्येक किलोमीटर अंतरावर लाल रंग पसरला होता.
लाल रंग कशामुळे दिसतो यामागचं कारण जरी वैज्ञानिकांना कळालेलं असलं तरी त्याच्या बायोलॉजीबाबतीत शास्त्रज्ञांना कोणतीही अधिक माहिती मिळालेली नाही. याशिवाय गोठलेल्या बर्फाळ प्रदेशात या एल्गी जीवंत कशा राहतात याबाबतही गूढ अद्याप कायम आहे. याचा हवामान बदलावर काही परिणाम होईल की नाही याबाबतही काही कळू शकलेलं नाही. पण येथील कार्बनडायऑक्साईडचं प्रमाण अधिक असल्यामुळे याठिकाणी एल्गी वाढत असावी असं सांगितलं जात आहे.
२०१६ साली 'नेचर मॅगझीन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार लाल रंगाचा बर्फ लवकर वितळत असल्यानं एल्गी हिमनद्यांचं अस्तित्व कमी करण्यास कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येतं. पण एल्गीच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाला आणि तेथील जीवजंतुंना धोका असल्याचं कोणताही निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.
अॅरिक मार्शलनं सांगितलं की एल्गीचं अस्तित्व म्हणजे पर्यावरणात बदल होत असल्याचं संकेत आहेत हे इतकं नक्कीच आपण गृहित धरू शकतो. कारण या हिमनद्यांच्या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांनी अशाप्रकारचा लाल रंग दरवर्षी दिसत असल्याचं सांगितलं आहे आणि याचं प्रमाण आपण निश्चित करू शकत नाही. पण मायक्रोएल्गी आल्प्स पर्वतरांगांमधील बर्फाला लाल करत असल्याचं प्रमाण वाढत आहे हे दिसून येत आहे.