जबरदस्त जॉब ऑफर! बिस्किटाचा स्वाद चाखा अन् वर्षाला ४० लाख रुपये पगार मिळवा

By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 11:34 AM2020-10-21T11:34:19+5:302020-10-21T11:37:43+5:30

कोरोना महामारीमुळं संपूर्ण जगातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या काळात बरीच क्षेत्रे अशी होती जिथे नोकरीची कमतरता होती, इतकेच नव्हे तर बर्‍याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढलं. दरम्यान, बिस्किट कंपनीने अशी नोकरी ऑफर केली आहे की ते ऐकून लोकांनी अर्ज करण्यास सुरूवात केली.

खरं तर, स्कॉटिश बिस्किट उत्पादक ‘बॉर्डर बिस्किट’ने अर्ज मागविले आहेत. यात कंपनीने घातलेली अट बहुधा कोणालाही आकर्षित करू शकेल. आम्ही 'मास्टर बिस्किटर' शोधत आहोत असं कंपनीनं म्हटलं आहे

'द इंडिपेन्डंट' च्या वृत्तानुसार, कंपनीला मास्टर बिस्कीटर पदासाठी अशा अर्जदारांची आवश्यकता आहे जे बिस्किटांचा स्वाद घेऊ शकतील. अर्जदाराला बिस्किट बनविण्याचं आकलन आणि त्याची चव असली पाहिजे. या व्यतिरिक्त, त्याच्याकडे नेतृत्व आणि संवाद कौशल्य देखील असले पाहिजे.

बॉर्डर बिस्किट या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पॉल बार्किन्स यांनी निवेदनात म्हटलं आहे की, बिस्किट उद्योगात रस असणाऱ्यांना ही उत्तम संधी आहे. आम्हाला या मास्टर बिस्किटरच्या ज्ञानाचा फायदा घ्यायचा आहे आणि असे बिस्किटे बनवायचे आहेत जे प्रत्येकाची पसंती बनेल.

याव्यतिरिक्त, बॉर्डर बिस्किटांचे ब्रँड हेड सुजी कार्लाव्ह म्हणतात की, ही कंपनी ग्राहकांना सर्वोत्तम स्वाद आणि गुणवत्तेचे बिस्किटे देण्यास कटिबद्ध आहे. आम्ही या कामासाठी मास्टर बिस्किटर शोधत आहोत.

पगाराबद्दल चर्चा केल्यास, अर्जदारास मास्टर बिस्कीटर पदासाठी वार्षिक ४० हजार पौंड म्हणजे सुमारे ४० लाख रुपयांचे पॅकेज मिळेल. आणखी रंजक गोष्ट म्हणजे यात वर्षाला ३५ दिवस सुट्टी देखील उपलब्ध असेल. ही पूर्णवेळ नोकरी असेल.

बॉर्डर बिस्किट कंपनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर खूप लोकप्रिय आहे. या पेजद्वारे, कंपनी आपल्या उत्पादनांची माहिती लोकांमध्ये शेअर करत असते. इन्स्टाग्राम युजर्सदेखील या पेजवरील माहिती उत्सुकतेने बघतात आणि प्रतिक्रिया देतात.

अहवालानुसार, कंपनी म्हणते की आम्ही देशभरातील लोकांना अर्ज करण्यास प्रोत्साहित करीत आहोत आणि प्रतिभावान लोकांची मुलाखत घेण्यासाठी उत्सुक आहोत.

या नोकरीची जाहिरात आल्यानंतर युजर्स अनेक कमेंट्स करत आहेत. हे सर्वोत्तम काम असेल. एकीकडे जिथे तुम्हाला बरेच पैसे मिळतील तर दुसरीकडे, बिस्किटे देखील विनामूल्य खाण्यासाठी उपलब्ध असतील.

सध्या जगभरात ४ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ कोटीहून जास्त लोकांचा जीव गेला आहे. कोरोना संकटामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. नोकऱ्या गेल्यामुळे लोकांवर आर्थिक संकटही उभं राहिलं आहे.

Read in English