कपाळावर हिरवे डोळे, समुद्राच्या तळाशी वास्तव्य; शास्त्रज्ञांना दिसला दुर्मिळ मासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 07:44 PM2021-12-14T19:44:34+5:302021-12-14T19:48:42+5:30

समुद्रातील प्राण्यांवर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका ग्रुपला समुद्राच्या तळाशी ''Barrelsys Fish'' दिसला आहे. जाणून घ्या या माशाची संपूर्ण माहिती...

पृथ्वीवर अनेक विचित्र आणि दुर्मिळ प्राणी आहेत. शास्त्रज्ञांना समुद्रात असाच एक दुर्मिळा मासा सापडला आहे. या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे, याच्या कपाळावर हिरव्या बल्बसारखे डोळे आहेत. असा मासा यापूर्वी कधीच पाहिला गेला नव्हता. कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी खाडीच्या खोलगट भागात शास्त्रज्ञांना हा मासा सापडला आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या माशाचे डोळे कपाळातून बाहेर येत असल्याचे भासतात. या विचित्र प्राण्याचे बोली भाषेतील नाव ''Barrelsys Fish'' आणि वैज्ञानिक नाव 'मॅक्रोपिना मायक्रोस्टोमा'' आहे. हा अत्यंत दुर्मिळ मासा असून, तो फार क्वचितच पाहायला मिळतो. मॉन्टेरी बे एक्वेरियम रिसर्च इन्स्टिट्यूटच्या(MBARI) शास्त्रज्ञांनी आतापर्यंत फक्त 9 वेळा हा मासा पाहिले आहे. हा मासा अखेरचा 9 डिसेंबर 2021 रोजी दिसला होता.

MBARI च्या रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल (ROV) ने गेल्या आठवड्यात मॉन्टेरी बे मध्ये डुबकी मारली तेव्हा शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले. कारण त्यांना स्क्रीनवर हा दुर्मिळ मासा पाहायला मिळाला. हा मासा 2132 फूट खोलीवर दिसला. कपाळावर हिरवे डोळे असलेला हा मासा जिथे सापडला आहे, ती जागा पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल पाणबुडी घाटी आहे.

MBARIचे वरिष्ठ शास्त्रज्ञ थॉमस नोल्स यांनी सांगितले की, सुरुवातीला मला हा मासा स्पष्टपणे दिसत नव्हता, पण लवकरच मला जाणवले की मी माझ्या डोळ्यांसमोर जगातील दुर्मिळ प्राण्यांपैकी एक पाहत आहे. सागरी प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना हा मासा आयुष्यात एकदाच पाहायला मिळतो, असं म्हटलं जातं.

आरओव्हीचा प्रकाश माशावर पडला तेव्हा या माशाच्या कपाळावरील हिरवे डोळे स्पष्टपणे दिसले. त्याच्या डोळ्यांवर द्रवाने भरलेले आवरण होते, हे आवरण त्याचया डोळ्यांचे रक्षण करते. त्याचे डोळे प्रकाशाप्रती संवेदनशील असतात, त्यामुळे प्रकाश दिसताच ते थोडे इकडे तिकडे पाहू लागतात. डोळ्यांवर थेट प्रकाश पडल्याने त्यांना त्रास होतो. त्यांच्या डोळ्यांसमोर दोन लहान कॅप्सूल आहेत, ज्यांचा वास घेण्यासाठी वापर होतो.

जापानच्या बेरिंग समुद्रापासून बाजा कॅलिफोर्नियापर्यंत खोल समुद्रात साधारणपणे बॅरेल्सिस फिश आढळतो. तो समुद्राच्या ट्वायलाइट झोनमध्ये, म्हणजे 650 फूट ते 3300 फूट खोलीत राहतो. पण,कधी-कधी तो 2000 ते 2600 फूट खोलीवरही आढळतो. या खोलीपासून पाण्याचा रंग गडद होऊ लागतो म्हणजे या खोलीवर प्रकास दिसत नाही. या अंधाऱ्या भागतच या माशाचे वास्तव्य आहे.

एमबीएआरआयचे शास्त्रज्ञ ब्रूस रॉबिसन यांनी सांगितले की, बॅरेलसिस फिशची लोकसंख्या किती आहे हे आम्हाला माहीत नाही. ट्वायलाइट झोनमध्ये दिसणारा हा अत्यंत दुर्मिळ मासा आहे. त्याऐवजी लँटर्न फिश, ब्रिस्टलमाउथ यांसारखे मासे सहज दिसत असले तरी हा मासा सहज दिसत नाहीत. या माशाबद्दल जास्त माहिती नाही, कारण हा खूप क्वचितच दिसतो. हा खोलीत राहत असल्यामुळे त्याला पकडणे शक्य नाही.

सहसा हा मासा शिकार करत नाहीत. तो एका ठिकाणी शांतपणे पडून राहतो. समुद्रातील प्लँक्टन, लहान मासे किंवा जेलीफिश तोंडासमोर येताच तो त्यांना खातो. हा मासा कित्येक वेळ एकाच ठिकाणी पोहू शकतो. त्याच्या रुंद आणि सपाट पंखांची त्याला खूप मदत होते. हा मासा दुर्मिळ असल्यामुळे त्याचा आकार, लांबी, रुंदी, वेग इत्यादींची फक्त कल्पनाच करता येते.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्याच्या डोळ्यांभोवतीचा पारदर्शक थर त्याला स्टिंग्रे, पॉइंटेड प्रोबोसिस आणि इतर माशांच्या दातांपासून वाचवतो. ब्रूस रॉबिसन म्हणाले की, आम्ही या सर्व गोष्टी अंदाज म्हणून सांगत आहोत. या माशाच्या नैसर्गिक उत्क्रांतीची आपल्याला कल्पना नाही.