कमाल! नवरदेवाचं नाव समाजवाद अन् नवरीचं 'ममता बॅनर्जी', तामिळनाडूतील अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 09:56 AM2021-06-12T09:56:52+5:302021-06-12T10:10:23+5:30

या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांना या लग्नाबाबत कळालं. त्यानंतर सगळीकडे या लग्नाची चर्चा रंगली.

तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील एका लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या लग्नाची चर्चा नवरी-नवरदेवांच्या इंटरेस्टींग नावांमुळे चर्चा होत आहे. या लग्नात नवरदेवाचं नाव 'समाजवाद' तर नवरीचं नाव 'ममता बॅनर्जी' आहे.

हे अनोखं लग्न तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात होत आहे. इथे 'समाजवाद'चं लग्न 'ममता बॅनर्जी'सोबत जुळवण्यात आलं आहे.

या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांना या लग्नाबाबत कळालं. त्यानंतर सगळीकडे या लग्नाची चर्चा रंगली.

समाजवाद नावाच्या नवरदेवाचं आणि ममता बॅनर्जी नावाच्या नवरीचं लग्न या रविवारी होणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जिल्ह्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ए.मोहन यांच्या मुलाचं नाव समाजवाद आहे आणि त्याचंच लग्न होणार आहे.

समाजवाद हा मोहन यांचा तिसरा मुलगा आहे. त्यांच्या इतर दोन मुलांचे नावं साम्यवाद आणि लेनिनवाद आहे. २०१६ मध्ये एका कम्युनिस्ट परिवारातील असलेल्या ए. मोहन यांनी निवडणुकही लढवली होती.

मोहन यांचा परिवार भाकपाचा समर्थक आहे. आता त्यांच्या मुलांसहीत सूनेचं नावही वेगळं मिळालं आहे. नवरीबाबत सांगायचं तर ती मोहन यांच्या नातेवाईकांची मुलगी आहे. नवरीचा परिवार कॉंग्रेस समर्थक आहे. तिचं नाव ममता बॅनर्जी आहे.

सध्या लग्नाची चर्चा केवळ तामिळनाडूच नाही तर संपूर्ण देशात रंगली आहे. नवरी-नवरदेवाचं नाव चर्चेत आलं आहे. आता रविवारी होणाऱ्या या लग्नात पाहुणे कोणकोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार दणका दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी पुन्हा सत्ता स्थापन केली आणि त्या मुख्यमंत्री झाल्या.

तसेच निवडणुकीआधी भाजपात गेलेले नेतेही तृणमूल कॉंग्रेसमध्ये परत येत आहेत. त्यामुळेही ममता बॅनर्जी सध्या देश पातळीवर चर्चेत आहेत. या कारणानेही या अनोख्या लग्नाची चर्चा अधिक होणं साहजिक आहे.

Read in English