सातासमुद्रा पलिकडून भारतात आले 'लाखो विदेशी पाहुणे'; पाहा हा भन्नाट नजारा By manali.bagul | Published: September 22, 2020 08:13 PM 2020-09-22T20:13:02+5:30 2020-09-22T20:24:39+5:30
गुजरातमध्ये सगळ्यात जास्त पाऊस कच्छ जिल्ह्यात झाला आहे. यावर्षी कच्छमधील सगळ्या नद्या, बांध पावसाच्या पाण्यानं तुडूंब भरले आहेत. तर दुसरीकडे कच्छमधील समुद्र पावसाच्या पाण्यामुळे भरभरून वाहत आहे. दरवर्षी या ठिकाणी १० लाख फ्लेमिंगो पक्षी पाहुणे बनून येतात. यावर्षीही लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी कच्छच्या परिसरात आले आहेत. या वर्षीचा नजारा मनमोहक आणि अद्भूत आहे.
फ्लेमिंगो पक्ष्यांचा हा नजारा भारतातील पक्षीप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं फ्लेमिंगो पक्ष्यासाठी अनुकुल वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रवासी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. प्रजननासाठी इराण आणि आफ्रिकेतून जवळपास १० लाख फ्लेमिंगो येतात.
हा नजारा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. पक्षीतज्ज्ञ रौनक गज्जर यांनी सांगितले की, वेगवेगळ्या देशातून आणि समुद्र पार करून दरवर्षी हजारो फ्लेमिंगो जवळपास १५ ते १६ किमी क्षेत्रात प्रजननासाठी येतात. कच्छच्या रणात तब्बल दीड फुड उंच मातीचं घरटं तयार करतात. चार ते पाच महिने प्रवास केल्यानंतर फ्लेमिंगो तीन ते चार अंडी देतात. आपली पिल्लं मोठी झाल्यानंतर त्यांना आपल्यासोबत इतर देशांमध्ये घेऊन जातात.
डीसीएफ डॉ.तुषार पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास नोंव्हेंबर ते मार्च दरम्यान याठिकाणी विदेशी पक्ष्याचे साम्राज्य असते. सकाळी आणि संध्याकाळी या पक्ष्यांचा नजारा पाहण्यासारखा असतो. प्रजननासाठी फ्लेमिंगो हेच ठिकाण का निवडतात यामागे एक कारण दडलं आहे.
मीठ आणि पाणी यामुळे ताज्या पाण्यात एका प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात. या बॅक्टेरियाद्वारे शैवाळ (एल्गी) तयार होतं. हे शैवाळ फ्लेमिंगोंचे अन्न असते. तसंच हे ठिकाण मानवी वस्तीपासून खूपच लांब असल्यामुळे सुरक्षित आहे.
सुरक्षितता, पोषक वातावरण आणि अन्न उपलब्ध असल्यानं फ्लेमिंगो या ठिकाणी येतात.