एमबीएची नोकरी सोडून या तरुणाने स्वीकारला आगळावेगळा मार्ग, आता कमवतो लाखो रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 06:29 PM2021-11-10T18:29:56+5:302021-11-10T18:46:34+5:30

ही कहाणी आहे हरियाणाच्या प्रदीप श्योराण यांची. नोकरी सोडल्यानंतर प्रदीप यांनी स्टार्टअप अंतर्गत दुधाचा व्यवसाय सुरू केला असून ते महिन्याभरात लाखो रुपये कमवत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची आणि दुधाचे उत्पादन पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची साथ सोडली नाही...जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास...

प्रदीप श्योराण हा हरयाणाचा रहिवासी आहे. प्रदीपने २०१८ मध्ये नोकरी सोडली आणि बागरी मिल्क पार्लर सुरू केले.

पूर्वी हा केवळ एक स्टॉल होता आज रोहतकमध्ये त्यांचे बरेच आउटलेट आहेत. एकेकाळी केवळ दुधापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज विविध प्रकारच्या २० उत्पादनांपर्यंत पोहोचला आहे.

आज केवळ हरियाणातीलच नाही तर दिल्ली, पंजाब, राजस्थानमधूनही लोक प्रदीपच्या 'बागडी मिल्क पार्लर'मध्ये येतात.

या संदर्भात प्रदीप सांगतात की, लहान-मोठ्या शहरातील सुशिक्षित आणि शेतकरी कुटुंबातील तरुण अशा प्रकारे स्वत:चे काम करून कुटुंबाला पुढे नेऊ शकतात.

प्रदीप हे मूळचे हरियाणातील चरखी दादरी या जिल्ह्यातील मांढी पिरानू गावचे रहिवासी आहेत. ते शेतकरी कुटुंबातील असून त्याचे वडील शाळेत नोकरी करायचे.

प्रदीप यांनी अशी माहिती दिली की, त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि सिव्हिल परीक्षेची तयारी सुरू केली, पण त्यात यश न मिळाल्याने त्याने एमबीएला प्रवेश घेतला.

एमबीएची पदवीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पण सुरुवातीला त्यांना हवी तशी नोकरी मिळू शकली नाही.

काही काळानंतर त्यांना व्हेल्स इलेक्ट्रिकमध्ये चांगली नोकरी मिळाली आणि ते त्या कंपनीत २०१८ पर्यंत होते. नोकरीत त्यांना अनेकवेळा प्रमोशनही मिळाले आणि पगारही चांगला होता. पण या कामातून त्यांना समाधान मिळत नव्हते.

प्रदीप यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्वतःची काही बचत होती आणि कुटुंबातील काही सदस्यांचाही पाठिंबा मिळाला.

2018 मध्ये नोकरी सोडून त्यांनी सुमारे 24 राज्यांतील विविध शेतकरी, व्यावसायिकांना भेटी दिल्या. कारण बिझनेस तर करायचाच होता पण असा काही बिझनेस करायचा होता ज्याला मार्केट मध्ये डिमांड आहे आणि जो चालणार आहे.

प्रदीप यांनी अशी माहिती दिली की, त्यांच्या सर्व दौऱ्यांमधून त्यांना एकच गोष्ट समजली की शेतकरी तीन प्रकारचे व्यवसाय करू शकतात - पहिला तृणधान्ये, कडधान्ये इत्यादी, दुसरा दूध आणि तिसरा अंडी इ. त्यामुळे आम्ही दूध व्यवसायाकडे जाण्याचा निर्णय घेतला

रोहतकमध्ये दोन मोठी उद्याने आहेत, जिथे सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी असते. या उद्यानांच्या बाहेर त्यांनी आपले ‘बागडी मिल्क पार्लर’ सुरू केले. त्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये सुरुवात केली तेव्हा थंडीच्या काळात ते मातीच्या कुल्हडमध्ये गरम दूध द्यायचे.