खऱ्या आयुष्यातला टारझन तुम्ही पाहाल तर धक्काच बसेल, शहरात आणताच विचित्र आजाराने मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:21 PM 2021-09-15T15:21:14+5:30 2021-09-15T15:59:09+5:30
जंगलात प्राण्यांच्या सान्निध्यात वाढलेल्या टारझन या काल्पनिक व्यक्तीची कथा आपल्या सर्वांना माहिती असेल. पण खऱ्या आयुष्यातही टारझन जिवंत होता. व्हिएतनाममध्ये हा रिअल लाईफ टारझन आढळून आला होता. मात्र शहरात येताच त्याचा एका विचित्र आजारामुळे मृत्यू झाला. तब्बल ४१ वर्षं जंगलात राहिलेला हो वॅन लँग (Ho van lang) जेव्हा जगासमोर आला होता, तेव्हा तो चांगलाच प्रसिद्ध झाला होता.
1972 मध्ये जेव्हा अमेरिका-व्हिएतनाम युद्ध (Vietnam var) सुरू होतं, तेव्हा अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यात लँगची आई आणि भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला होता. यानंतर लँगचे वडील त्याला आणि त्याच्या भावाला घेऊन गाव सोडून दूर जंगलात राहायला गेले. या जंगलामध्येच लँग लहानाचा मोठा झाला.
जंगलातल्या 40 वर्षांच्या काळात त्याने केवळ पाच व्यक्तींना पाहिलं होतं. प्रत्येक वेळी माणूस दिसला की तो दूर पळून जायचा. या जंगलातच तो शिकार करून, फळं खाऊन आपली गुजराण करायचा.
अल्वारो सेरेजो (Alvaro Serejo) नावाच्या एका फोटोग्राफरनं त्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपलं होतं. असा माणूस जिवंत असल्याचं त्यानंतर सर्वांना समजलं. त्याला तेव्हा रेस्क्यू टीमने एका जवळच्या गावात नेलं.
या ठिकाणी लँगने पहिल्यांदाच महिला पाहिल्या होत्या. विशेष म्हणजे आपल्या व्यतिरिक्त आणखी माणसं या जगात आहेत याचीही कल्पना त्याला नव्हती.
२०१३ मध्ये लँगची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी वैद्यकीय मदतीसाठी माणसांशी संपर्क साधला होता. लँगचे वडील हो वान थान (Ho van than) यांना तेव्हाही वाटत होतं, की व्हिएतनाम युद्ध सुरू आहे; मात्र हे युद्ध संपल्याची माहिती मिळताच त्यांनी पुन्हा गावात राहण्यास सुरुवात केली.
यानंतर लँग मानवी वस्तीतच राहू लागला. मात्र, आतापर्यंत जंगलात, कोणतीही भेसळ नसलेल्या गोष्टी खाणाऱ्या लँगला शहरातले पदार्थ रुचले नाहीत. तसंच, शहरी जीवनशैलीतला ताणही त्याला सहन झाला नाही.
यासोबतच त्याला शहरात आल्यानंतर दारूचं व्यसनही जडलं. त्यामुळे त्याला लिव्हर कॅन्सर झाला.
त्यामुळे जंगलातून पुन्हा शहरात राहायल्या आल्यानंतर अवघ्या आठ वर्षांमध्येच म्हणजेच वयाच्या ५२व्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला.