बळीराज्याला रडवणाऱ्या कांद्याच्या समस्येवर मराठमोळ्या तरूणीनं शोधला उपाय; मंत्र्यांनीही केलं कौतुक By manali.bagul | Published: November 11, 2020 05:43 PM 2020-11-11T17:43:37+5:30 2020-11-11T18:08:31+5:30
भारतातील सर्वाधिक लोक शेती करत असून अर्थव्यवस्थेत सगळ्यात मोठी भूमिका ही शेतीच्या व्यवसायाची आहे. पण आर्थिक संकटं, वातावरणातील बदल, निसर्गाचे चक्र यांमुळे बळीराजाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. वेळेवर कमी पैश्यात काम करणारे मजूर न सापडणं, चढ्या भावाने होणारी खतांची विक्री, बँकांकडून कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी, खासगी सावकारीचा वेढा, नैराश्य अशा अनेक कारणांमुळे दरवर्षी शेतकरी आत्महत्या होतात. त्यातल्या त्यात कांदा उत्पादकांवरही संकट ओढातात. कधी कांद्याचं उत्पादन वाढतं तर कधी कमी होतं. नशिब चमकलं तर चमकलं नाही तर नुकसान होणार.
महाराष्ट्रातील लासलगाव हे गाव कांद्यासाठी सुप्रसिद्ध आहे. इथंच लहानाची मोठी झालेली कल्याणी शिंदे ही मराठमोळी तरूणी. कॉम्प्यूटर सायन्सची पदवी घेतलेल्या कल्याणीने लहानपणापासून कांद्याची लागवड, बाजारभावात तेजीमंदीने येणारे चढ उतार हे पाहून शिक्षण पूर्ण झाल्यावर या समस्येवर काही तरी तोडगा काढला पाहिजे असा विचार केला. नाशिक जिल्हा कांदा उत्पादन आणि द्राक्ष लागवड यासाठी प्रसिद्ध आहे. पण अनियमितता, पीकाचं नुकसान वारंवारं होत असल्यामुळे बळीराज्याला जॅकपॉट लागला तर लागला, नाहीतर सगळीच माती.
कांद्याच्या दरात कधी कधी कमालीची वाढ व्हायची तर कधी दर इतके कोसळायचे जणू काही भयंकर नुकसानाचा सामना करावा लागतो. हा दोलक बाजारभावात ८००% पर्यंत वाढ करायचा किंवा घट करायचा. ही टक्केवारी म्हणजे अगदी जीवघेणी ठरावी. म्हणूनच कल्याणी शिंदेने यावर एक उपाय शोधून काढला.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फाऊंडेशनकडून नाशिक पीक प्रकल्पासाठी तिची निवड झाली. या प्रकल्पावर काम करत असताना २३ वर्षाच्या या तरुणीला एक महत्त्वाचा भाग लक्षात आला, चांगल्या पीकाला देशी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मागणी आहे. पण साठवणूक करताना अडचण येऊ शकते म्हणून कल्याणीने साठवणूकीसाठी एक चांगला पर्याय शोधून काढला.
कांद्याची शेती करताना लावण, पेरणी, काढणी, कांदा वेचणं हे सारं साधारण १२० दिवसांत होतं. मग साठवणीसाठी कांदा गोदामात पाठवला जातो. त्याठिकाणी तो सडण्याचा धोका असतो. हे सगळ्यात आधीन तिने लक्षात घेतलं. त्यासाठी तिने अधुनिक IOT तंत्रज्ञान वापरुन उपकरण तयार केलं. यामुळे गोदामातील खराब झालेल्या कांद्याचा वास ओळखून ते कांदे बाजूला काढून इतर कांद्याची नासाडी टाळता येणं शक्य झालं. तुमचा विश्वास बसणार नाही पण कांदा खराब होण्याचं प्रमाण ५० टक्क्यावरुन २५ टक्के कमी झालं.
शेतकरी कुटुंबात वाढलेल्या कल्याणीला शेतकरी लोकांच्या अडचणींची माहिती लहानपणापासूनच होत गेली. हा उपक्रम सुरू केल्यानंतर तीनं हळूहळू कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या प्रकल्पात सहभागी करुन त्यांची समस्या सोडवायची तयारी दाखवली. आता कल्याणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. त्यापैकी ८०% शेतकरी पारंपरिक पद्धतीने कांद्याची साठवण करतात. आता गोदाम इन्व्हेन्शन कडून या गोदामात हवा खेळती रहाण्यासाठी, कांद्यातील पाण्याचे प्रमाण ३०% पर्यंत रहावे यासाठी आणि गोदामाचं स्वरुप बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या तंत्राचा वापर करून खराब कांदा आधीच काढून टाकला, की इतर कांद्याची नासाडी टाळणं शक्य होतं. गेल्या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री कै. अरुण जेटली यांनी या प्रकल्पाचा उल्लेख आपल्या भाषणात अतिशय कौतुकास्पद प्रकल्प असा केला होता. त्याचं नामकरण त्यांनी “आॅपरेशन ग्रीन” असं केले होते.
भविष्य काळात असे तंत्रज्ञान वापरुन बनवलेली गोदामं असणं हे खरोखरच आवश्यक आहे, जेणेकरून बळीराजाला आतापर्यंत जसा नुकसानाचा सामना करावा लागला तशी परिस्थिती ओढावणार नाही. कल्याणीच्या या कामाबद्दल सामाजातील विविध स्तरावर तिचे कौतुक होत आहे