लग्न करा अन् मिळवा साडेचार लाख रुपये; ‘या’ देशाच्या सरकारचा अनोखा निर्णय

By प्रविण मरगळे | Published: September 22, 2020 03:11 PM2020-09-22T15:11:18+5:302020-09-22T15:14:53+5:30

जपानमधील जन्म दर वाढविण्यासाठी सरकारने एक अनोखं पाऊल उचललं आहे. सरकारने विवाहित जोडप्यांना सहा लाख येन म्हणजेच सुमारे साडेचार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

देशात वेगाने घसरत जाणाऱ्या जन्मदाराला आळा घालणे आणि लग्न केलेल्या जोडप्यांना मुल जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी सरकारने अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी जपानमध्ये सर्वात कमी ८ लाख ६५ हजार मुले जन्माला आली होती आणि एका वर्षात जन्मदरापेक्षा मृत्यूची संख्या ५ लाख १२ हजारांपेक्षा जास्त होती. जन्म आणि मृत्यूच्या आकडेवारीतील फरक आतापर्यंत सर्वात मोठा आहे. जपानची लोकसंख्या १२ कोटी ६८ लाख इतकी आहे.

लोकसंख्येनुसार, जपान जगातील सर्वात वयोवृद्ध देश आहे, या ठिकाणी १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या देखील जास्त आहे. लेन्सेटने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जपानमध्ये जन्म दर असाच राहिला तर २०४० पर्यंत वृद्धांची संख्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त होईल.

जन्म आणि मृत्यू दर यांच्यामधील ही तफावत दूर करण्यासाठी जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे, त्यासाठी सरकारने काही अटीदेखील ठेवल्या आहेत, ज्याअंतर्गत काही जोडपेच यासाठी पात्र ठरू शकतात.

या योजनेचा एक भाग होण्यासाठी जोडप्याचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि दोघांची एकत्रित कमाई ३८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.

या व्यतिरिक्त जर तरुण जोडप्याचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांची कमाई ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. जपानखेरीज इतरही अनेक देश आहेत, जिथे मुलांना जन्म देण्यास प्रोत्साहन म्हणून ही रक्कम दिली जाते. जपाननंतर इटलीमध्येही वेगाने जन्मदर घसरत आहे.

इटलीमध्ये प्रत्येक जोडप्याला मुल होण्यासाठी ७० हजार रुपये दिले जातात. युरोपियन देश एस्टोनियामध्ये जन्म दर वाढवण्याबरोबरच नोकरी करणाऱ्यांना दीड वर्षापर्यंत संपूर्ण पगारासह सुट्टी देण्यात येते.

याशिवाय तीन मुलांच्या कुटुंबाला दरमहा २५,००० रुपयांचा बोनस मिळतो. इराणमधील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना पुरुषांची नसबंदी करण्यास बंदी आहे.

इराणमध्ये गर्भनिरोधक औषधे देखील अशा स्त्रियांना दिली जातात ज्यांना खरोखर त्यांची आवश्यकता आहे. इराणमध्ये अधिक मुलांना जन्म देणाऱ्या कुटुंबांना अतिरिक्त रेशन दिलं जाते.

Read in English