तब्बल ८० वर्षे न खाता-पिता जिवंत राहणाऱ्या ‘या’ साधूचं वैज्ञानिकांना कोडं; नरेंद्र मोदी आहेत त्यांचे भक्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:32 AM2020-05-17T08:32:50+5:302020-05-17T08:41:44+5:30

एखादी व्यक्ती खाण्यापिण्याशिवाय जगू शकते? तीसुद्धा एका दिवस, आठवडाभर किंवा महिन्यासाठी नव्हे तर तब्बल ८० वर्ष न खाता-पिता जगता येऊ शकते, हो ही अशक्य गोष्ट शक्य केलीय एका साधू महाराजाने.

आपल्याला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. गुजरातच्या प्रह्लाद जानी असं या महाराजांचे नाव आहे. मागील ८० वर्षापासून प्रल्हाद जानी यांनी काहीही खाल्ले किंवा प्यायलेले नाही.

अगदी योगाच्या जोरावर त्यांनी आपले दैनंदिन कामकाज (शौचालय) बंद केले आहेत आणि हे सर्व करूनही ते पूर्णपणे स्वस्थ, निरोगी आणि जिवंत आहेत.

गुजरातच्या मेहसाणा येथील रहिवासी प्रल्हाद जानी उर्फ माताजी चुनरीवाले नावानं प्रसिद्ध असणारे विज्ञानासाठी मोठं आव्हान बनले आहे. प्रल्हाद जानी सांगतात की, जेव्हा ते दहा वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आध्यात्मिक जीवनासाठी आपले घर सोडले. ते वर्षभर अंबामाताच्या भक्तीत मग्न राहिले, त्यानंतर अंबामाताची त्यांच्यावर कृपा झाली त्यावेळपासून त्यांना भूक किंवा तहान लागत नाही.

इतकेच नाही तर अंबामाताच्या भक्तीत लीन असता असता त्यांनी त्यांच्या नाकात नथ, साडी, सिंदूर असं राहण्यास सुरुवात केली. प्रल्हाद जानी गेली ५० वर्षे गुजरातच्या अहमदाबादपासून १२० कि.मी. दूर असणाऱ्या टेकडीवरील अंबाजी मंदिराच्या गुहेजवळ राहत आहेत.

प्रल्हाद जानी यांच्या दाव्यांमुळे वैज्ञानिक आणि डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. भारत आणि परदेशातील डॉक्टरांसह इस्रोच्या वैज्ञानिकांनाही प्रल्हाद जानीचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. यासाठी देशातील सुप्रसिद्ध संस्था डीआरडीओच्या वैज्ञानिकांच्या टीमने आणि कधीकधी बडय़ा डॉक्टरांच्या पॅनेलने प्रल्हाद जानी यांना सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नजरेत सलग १५ दिवसापासून महिनाभरापर्यंत २४ तास निगराणीत ठेवलं.

याठिकाणी प्रत्येक सेकंदाचा व्हिडीओ घेण्यात आला. यावेळी त्यांनी ना काही खाल्ल, काही पाणी प्यायले ना, शौचालयास गेले. त्यानंतर, डॉक्टरांपासून ते वैज्ञानिकापर्यंत प्रत्येकालाच आश्चर्य वाटले की एखादी व्यक्ती इतकी वर्षे न खाता-पिता आणि शौचालयात न जाता कसे जगू शकते. डॉक्टरांनी त्यांच्या शरीराच्या अंतर्गत क्रियांची माहिती घेण्यासाठी त्यांच्या अनेक चाचण्या केल्या.

या चाचणीत समोर आलं की, प्रल्हाद जानी यांच्या शरीरात यूरिन बनतं पण ते गायब कुठे होतं याचा शोध लावण्यात अद्याप वैज्ञानिक अपयशी ठरलेत. तेव्हापासून, वैद्यकीय जगतात प्रल्हाद जानी एक रहस्य बनून राहिले आहेत.

अहमदाबाद येथील स्टर्लिंग हॉस्पिटलमधील डॉ. सुधीर शाह या न्युरॉलॉजिस्टनी त्यांची ही तपासणी केली होती. त्यांनीही प्रल्हाद जानी यांच्यावर अभ्यास केला असून जानी न खाता-पिता व्यवस्थित जिवंत राहू शकतात यावर शिक्कामोर्तब केले आहे.

तसेच आपण एक हजार वर्षे जगू असा दावा प्रल्हाद जानी यांनी केला आहे. यासह ते एड्स, मधुमेह यासारख्या गंभीर आजारावर उपचार करण्याचा दावाही करतात. इतकेच नाही तर ते संततीविरहित लोकांना एक फळ देऊन उपचार करतात. त्यांनी शेकडो लोकांवर उपचार केले असल्याचे त्यांचे भक्त सांगतात.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रल्हाद जानी यांचे भक्त आहेत. २५ वर्षापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान जानी यांनी मोदींना ते मुख्यमंत्री बनतील असा आशीर्वाद दिला होता. तेव्हा मोदी मुख्यमंत्री बनतील अशी कोणतीच चिन्हे नव्हती. त्यामुळे मोदीही या आशीर्वादाने आश्चर्यचकीत झाले.

त्याचसोबत २००९ मध्ये नरेंद्र मोदी प्रल्हाद जानी यांच्या दर्शनसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मोदींना पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद दिला होता. २०१४ मध्ये हे सत्यात उतरलं. तेव्हापासून नरेंद्र मोदी प्रल्हाद जानी यांचे निस्सीम भक्त बनले.