कुंभकर्णांचं गाव! येथील लोक आठवडाभर राहायचे झोपून, समोर आलं धक्कादायक कारण By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:58 PM 2021-05-26T12:58:30+5:30 2021-05-26T13:06:44+5:30
Jara Hatke News: एका छोट्याशा गावातील लोक गेल्या काही वर्षांपासून एका रहस्यमय त्रासाशी झुंज देत होते. या गावातील १५० हून अधिक लोक एक एक आठवडाभर झोपून राहायचे. त्यामुळे या गावातील लोकांना झोपेचीही भीती वाटू लागली होती. कलाची नावाच्या या गावातील लोकांचा त्यामुळे खूप विचित्र परिस्थितीशी सामना होत होता. मध्य आशियातील कझाखस्तान या देशातील एका छोट्याशा गावातील लोक गेल्या काही वर्षांपासून एका रहस्यमय त्रासाशी झुंज देत होते. या गावातील १५० हून अधिक लोकांना हिंसक मतिभ्रम व्हायचा. तसेच ते एक एक आठवडाभर झोपून राहायचे. त्यामुळे या गावातील लोकांना झोपेचीही भीती वाटू लागली होती. कलाची नावाच्या या गावातील लोकांचा त्यामुळे खूप विचित्र परिस्थितीशी सामना होत होता.
या गावातील बहुतांश रहिवासी हे जर्मन आणी रशियन आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या गावातील लोक अचानक झोपी जात. अनेकदा तर लोक चालता चालता झोपत. नंतर अशक्तपणा, डोकेदुखी आणि स्मृतिभ्रंशासोबत त्यांना झोपेतून जाग येत असे. अनेकदा लोक झोपेत चालायचे. मात्र त्यांना उठवले तर काही आठवत नसे.
ही समस्या केवळ गावातील प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही जाणवत होती. लहान मुलांना बेडवर साप किंवा उडणारे घोडे दिसायचे. त्यानंतर या प्रकाराबाबत एक माहिती पुढे आली. काही लोकांनी सांगितले की, सोव्हिएट युनियनच्या काळापासून या गावाजवळ युरेनियमची खाण आहे. त्यामुळे असे होण्याची शक्यता आहे.
काही लोकांचे म्हणणे होते की, पाण्यामध्ये कसलेतरी रसायन मिसळून त्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मनावर ताबा मिळवला जात आहे. अखेर सरकारने माहिती घेऊन याबाबत आपला अहवाल सादर केला होता. २०१५ मध्ये कझाखस्तान सरकारने सांगितले की, या परिसरातील खाणीमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साई़डमुळे येथील गॅस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येथील लोकांचे वर्तन बदलले आहे.
जेव्हा या गावाजवळ तपासणी करण्यात आली तेव्हा येथे कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा १० पटीने अधिक असल्याचे दिसून आले. त्यानंतर सरकारने अनेक कुटुंबांना या क्षेत्रातून बाहेर काढले. सध्या या गावात १२० कुटुंबे वास्तव्यास आहेत. तसेच कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाणही आटोक्यात आल्याने तेथील रहिवासी सामान्य जीवन जगत आहेत.