largest gold mine:'या' ठिकाणी आहे KGF पेक्षा कैकपटीने मोठी सोन्याची खाण, पाहून चकीत व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:29 PM2022-04-07T19:29:24+5:302022-04-07T19:36:19+5:30

largest gold mine: एका अंदाजानुसार, येत्या दशकात या खाणीतून किमान US$5 अब्ज (भारतीय चलनानुसार 3 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त) किमतीचे सोन्याचे उत्पादन होऊ शकते.

आजकाल आपल्या देशात सोन्याच्या खाणींची बरीच चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे, देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण असलेल्या 'कोलार गोड्ल फिल्डवर' आधारित 'KGF' सिनेमा. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आज आम्ही तुम्हाला आशियातील अशा एका सोन्याच्या खाणीबद्दल सांगणार आहोत, जी 'KGF' पेक्षा अनेक पटींनी मोठी आहे, तसेच आशियातील सर्वात मोठ्या खाणींपैकी एक आहे.

दोन दशकांहून अधिक काळानंतर किरगिझस्तानने मध्य आशियातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींपैकी एक असलेल्या 'कुमटोर' सोन्याच्या खाणीवर पूर्ण ताबा मिळवला आहे.

ही सोन्याची खाण किरगिझस्तान सरकार आणि सेंट्रा गोल्ड या कॅनडाची खाण कंपनी यांच्यातील भांडणात अडकली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पेरुच्या यानाकोचा खाणीनंतर ही जगातील दुसरी सर्वात मोठी खाण आहे.

WION च्या बातमीनुसार, किरगिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष सादिर झापरोव यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्राला संबोधित करताना सांगितले की, 'आम्ही सेंट्रा कुमटोर खाणीचा गोल्डसोबत सुरू असलेला वाद पूर्णपणे मिटवला असून, आता खाण पूर्णपणे किरगिझस्तान सरकारच्या मालकीची झाली आहे.

आता खाणीच्या पूर्ण नियंत्रणासह मध्य आशियाई देश असलेल्या किरगिझस्तानला $53 दशलक्ष मिळण्याची अपेक्षा आहे, तर कॅनडाची कंपनी सेंट्रा युनायटेड स्टेट्स, स्वीडन आणि कॅनडामधील किरगिझस्तानविरोधात असलेले सर्व खटले संपवेल. या खाणीचे मूल्य US$3 अब्ज आहे.

किरगिझस्तानच्या अंदाजानुसार, येत्या दशकात या खाणीमधून किमान US$5 अब्ज (भारतीय चलनानुसार 3 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त) किमतीचे 160-200 टन सोन्याचे उत्पादन होऊ शकते.

या खाणीचा शोध लागल्यानंतर त्याच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करताना अध्यक्ष सादिर यांनी स्पष्ट केले, 'आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासाला खऱ्या अर्थाने वळण देणारा आहे. आज आपल्या जनतेने आपल्या नशिबाची जबाबदारी स्वतःच्या हातात घेतली आहे. यावरुन हे सिद्ध होते की, आपण शाश्वत वाढ आणि विकासाच्या मार्गावर आहोत.'

उल्लेखनीय बाब म्हणजे किरगिझस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या वर्षी विदेशी राजदूतांना खाणींना भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये भारत, ब्रिटनचे राजदूत, अझरबैजानच्या दूतावासांचे प्रतिनिधी आणि संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक, UN FAO, UNDP यांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

कुमटोर सोन्याचा साठा टिएन शान मेटॅलोजेनिक बेल्टमध्ये आहे, ज्याला एशियन गोल्ड बेल्ट देखील म्हणतात. हा उझबेकिस्तानपासून चीनमधील शिनजियांगपर्यंत पसरलेला आहे.