लग्नातल्या 'या' हटके परंपरांबाबत तुम्ही कधी ऐकलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 02:32 PM2018-11-15T14:32:12+5:302018-11-15T15:07:00+5:30

लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. सध्या लग्नाचे मुहूर्त सुरू झाल्याने सर्वत्र लग्न सराईची धामधूम पाहायला मिळत आहे. भारतात वेगवेगळे धर्म आणि प्रांतानुसार लग्नातील रितीरिवाज आणि परंपरा वेगळ्या आहेत. अशाच काही हटके परंपरांबाबत जाणून घेऊया.

गुजराती लग्नामध्ये नवरदेवाची सासू त्याची आरती करते. तसेच आरती केल्यावर मुलाचं नाक ओढून स्वागत करते. या विधीला 'पोंकवू' असे म्हटले जाते.

मराठी लग्नामध्ये नवऱ्या मुलीचा भाऊ नवरदेवाचा कान खेचतो आणि आपल्या बहिणीची नीट काळजी घेण्याचा सल्ला देतो.

उत्तर प्रदेशच्या सरसौलमध्ये नवरदेव आणि वर पक्षावर टोमॅटो फेकून त्यांचं स्वागत केलं जातं. नव्या नात्याला यामुळे बळकटी मिळते.

सिंधी लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र आणि काही नातेवाईक त्याचे कपडे फाडतात. जुन्या गोष्टींचा शेवट करून भावी आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी असं केलं जातं.

बंगाली लग्नामध्ये नवरदेवाची आई लग्न पाहत नाही. कारण मुलाचं लग्न पाहिल्यास नवीन जोडप्यासाठी ते अपशकून मानलं जातं.

तमिळ लग्नामध्ये नवरा मुलगा संन्यासी होण्यासाठी लग्न मंडपातून पळून जाण्याचं नाटक करतो आणि मुलीचे वडील त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात.

पंजाबी लग्नामध्ये नवऱ्या मुलीची आई जवळच्या एका मंदिरातून पाणी आणते. त्या पाण्याने अंघोळ केल्यानंतरच नवरी मुलगी लग्नाचे खास कपडे परिधान करते.

राजस्थानातील काही भागात वधु आणि वर पक्षाने खरेदी केलेल्या सर्व भेटवस्तू नातेवाईकांना दाखवाव्या लागतात. याला 'दिखावा' असं म्हटलं जातं.