हौस पडली महागात, स्वतःचीच दाढी जीवघेणी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 11:44 AM2020-03-14T11:44:08+5:302020-03-14T12:21:21+5:30

अनेकांना दाढी वाढवण्याचा खूप शौक असतो. पण तुम्हाला कल्पनाही नसेल एका व्यक्तीचा दाढी वाढवल्यामुळे मृत्यू झाला होता. ही घटना ऑस्ट्रीयामधील आहे. ‘ब्राउनाउ अॅम इन’ या लहानश्या गावात ही भयानक घटना घडली होती.

ऑस्ट्रियातील हे गाव या माणसाच्या दाढीसाठी प्रसिद्ध होते. या गावाचा संबंध हिटलरशी सुद्धा आहे. हिटलरचं जन्मस्थान म्हणून हे गाव कुप्रसिद्ध आहे

ही घटना १५६७ सालातली आहे. हान्स स्टेनिंजर हे एक नेता म्हणून तर प्रसिद्ध होते. पण त्यांच्या ४.५ फुट लांब लचक दाढीमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली होती. वर्षानुवर्ष अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी आपली दाढी राखली होती.

या व्यक्तीने दाढी व्यवस्थित राहावी म्हणून खिसे तयार करून घेतले होते. या खिशांमध्ये दाढी गुंडाळून ठेवायचा. कारण जर दाढी तशीच लोंबकळत ठेवली आणि कोणी त्यावर पाय दिला तर जीव जाण्याची भीती होती. नेमका तसाच काहिसा प्रकार घडला.

१५६७ साली ब्राउनाउ अॅम इन गावाला आग लागली. लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आणि एकच धावपळ सुरु झाली. मेयर असल्याने लोकांना शांत करण्याची जबाबदारी हान्स स्टेनिंजर यांच्यावर होती. याच गडबडीत त्यांची दाढी खिशातून बाहेर पडली, पण वेळ नसल्याने ती पुन्हा गुंडाळून ठेवण्यास ते विसरले.

स्टेनिंजर हे पायऱ्यांच्या टोकावर उभे होते. नंतर अचानक त्यांचा पाय स्वतःच्याच दाढीवर पडला. दुसऱ्याच क्षणाला ते पायऱ्यांवरून कोसळले. त्यांच्या दाढीच्या दोन टोकांमध्ये ते असे काही अडकले की त्यांची मान मोडली.

ज्या दाढीमुळे हान्स स्टेनिंजर यांना अभिमान वाटायचा. त्याच दाढीने त्यांचा जीव घेतला.

हान्स स्टेनिंजर यांच्या मरणानंतर ब्राउनाउ अॅम इनच्या नागरिकांनी त्यांच्या आठवणी सांभाळून ठेवल्या. हान्स स्टेनिंजर यांची एक भलीमोठी मूर्ती तयार करण्यात आली.

ही मूर्ती आजही गावात आहे. लोक इथेच थांबले नाहीत. त्यांनी हान्स स्टेनिंजर यांना पुरण्यापूर्वी त्यांची दाढी कापून घेतली.

ही दाढी आज गावाच्या वस्तुसंग्रहालयात जपून ठेवण्यात आली आहे. पर्यटकांना या दाढीची प्रतिकृती दिली जाते.