५ मीटर कापडाने केली सुरुवात, मास्क शिवणाऱ्या आजीबाईला शेजाऱ्यांकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 01:54 PM2020-04-26T13:54:44+5:302020-04-26T14:16:31+5:30

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचता यावं यासाठी सोशल डिस्टेंसिंग सगळ्यात महत्वाचं समजलं जातं आहे. कोरोना हरवण्यासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत लोकांचा आधार बनण्याचे काम करत असताना समाजातील काही लोक असे सुद्धा आहेत पोलिसांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहेत.

वयाची ७९ वर्ष पूर्ण केलेल्या माया शर्मा या आजी तासनतास शिलाई मशिनवर बसून काम करत आहेत. या आजी राजस्थानातील जयपूरच्या रहिवासी आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ७०० ते ८०० मास्क तयार केले आहेत. विशेष म्हणजे या आजींनी घरी तयार केलेले हे मास्क त्यांचा मुलगा रुग्णालयात, पोलिस कर्मचारी आणि भाजी विक्रेत्यांना मोफत वाटत आहे.

यांचा मुलगा मनीष यांनी सांगितले की, आईला नेहमी मदत करायला आवडतं. पती बल्लभ शर्मा रेल्वेत गार्डची नोकरी करत होते. कमी पगार असल्यामुळे जेवढं हाती यायचं तेवढ्यावरचं भागवावं लागत होतं. अशात माझी आई १५ ते २० स्वेटर शिवायची. चारही मुलांसाठी स्वतः कपडे शिवायची. सध्या घरातील शिलाई मशिनला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. अशात मास्कची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी मास्क शिवायला सुरूवात केली.

या कामाची प्रेरणा त्यांनी वर्तमानपत्र वाचून मिळाली. अनेक डॉक्टरर्स दिवसभर नोकरी करून रात्री मास्क शिवत असल्याचं त्यांच्या वाचण्यात आलं. तेव्हा त्यांनी विचार केला की, दिवसभर नोकरी करून डॉक्टर मास्क तयार करू शकतात. तर मी का नाही करू शकत? म्हणून त्यांनी त्या दिवसापासून मास्क तयार करायला सुरूवात केली.

लॉकडाऊन सुरू होण्याआधी पासूनच त्यांनी मास्क शिवायचं काम सुरू केलं होतं. सुरूवातीला पाच मीटर कापड वापरून जितके मास्क तयार केले. तितके त्यांनी आपल्या मुलाला वाटप करण्यास दिले. १०० मास्क तयार करून कापड संपले. लॉकडाऊन सुरू झालं होतं. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या कपड्यांपासून मास्क तयार बनवले.

रोज सकाळी पाच वाजता उठून नाष्ता केल्यानंतर त्यांचं शिलाईचं काम सुरू असायचं. कापड संपल्यानंतर या आजी आराम करायच्या. पण रोज आजूबाजूला राहत असलेल्या व्यक्तींपैकी कोणीतरी कापड आणून देत असायचं. त्यांच्या या कामात शेजारी राहत असलेल्या महिलांनी खूप मदत केली. आजीचं वय जास्त असल्यामुळे सुईत धागा सुद्धा टाकता येत नव्हता. अशावेळी त्यांची नात काव्या त्यांना हे काम करण्यास मदत करत होती.

माया सांगतात की, फक्त स्वतःची सुरक्षा नाही तर संपूर्ण देश सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाने योगदान द्यायला हवं. ४ एप्रिलला आपला ७९ व्या वाढदिवस साजरा केलेल्या माया यांनी सगळ्यांना घरी राहण्याचे आणि कोरोनाशी लढण्यासाठी देशाला साथ देण्याचे आवाहन केलं आहे.

(Image credit- Dainik bhaskar)