Mysterious Village: हे आहे भारतातील सर्वात रहस्यमयी गाव; एका रात्रीत हजारो लोक गायब झाले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 12:51 PM2022-06-06T12:51:56+5:302022-06-06T12:57:57+5:30

Kuldhara Village: राजस्थानच्या जैसलमेरपासून 14 किलोमीटर अंतरावर हे गाव असून, गेल्या 200 वर्षांपासून गाव ओसाड पडलं आहे.

Kuldhara Village is Mysterious: भारतातील सर्वात रहस्यमय गावांमध्ये राजस्थानच्या कुलधाराचे नाव सर्वात वर येते. जैसलमेरपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेले कुलधारा गाव गेल्या 200 वर्षांपासून ओसाड पडले आहे.

वाळवंटात वसलेले कुलधारा गाव खूप सुंदर होते, परंतु येथे राहणारे सर्व लोक 200 वर्षांपूर्वी एका रात्रीत आपले गाव सोडून निघून गेले आणि परत आलेच नाहीत.

200 वर्षांपूर्वी पालीवाल ब्राह्मण कुलधारा गावात राहत होते. हे गाव जैसलमेर संस्थानातील सर्वात आनंदी आणि समृद्ध गावांपैकी एक होते.

संस्थानांना या गावातून जास्तीत जास्त महसूल मिळत असे. येथे अनेक प्रकारचे उत्सव, पारंपरिक नृत्य, संगीत महोत्सव होत असत. सध्या हे गाव पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, गावात एका मुलीचे लग्न होणार होते. ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती. त्यादरम्यान, जैसलमेर राज्याचा दिवाण सलीम सिंग याने त्या मुलीवर वाईट नजर टाकली आणि तिचे सौंदर्य पाहून त्याने मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव पाठवला.

सलीम सिंग याच्याबद्दल असे म्हटले जाते की, तो एक अत्याचारी व्यक्ती होता. त्याच्या क्रूरतेच्या कहाण्या दूरवर प्रसिद्ध होत्या. त्यामुळेच कुलधारा गावातील लोकांनी सलीम सिंगसोबत मुलीचे लग्न लावण्यास नकार दिला.

लग्नाचा प्रस्ताव न स्वीकारल्यानंतर सलीम सिंग याने गावकऱ्यांना विचार करायला काही दिवस दिले, मात्र त्यानंतरही ते तयार झाले नाहीत.

सलीम सिंगचे म्हणणे न ऐकल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल आणि तो संपूर्ण गावात नरसंहार घडवून आणेल, हे गावकऱ्यांना माहीत होते. यानंतर गावातील लोकांनी आपल्या मुलीची आणि गावाची इज्जत वाचवण्यासाठी कुलधारा गाव कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला.

अखेर पंचायत बसवून एकमताने निर्णय घेण्यात आला. यानंतर रातोरात गावातील सर्व लोकांनी घरातील सर्व सामान, गुरेढोरे, धान्य, कपडे घेऊन कायमचे निघून जाण्याचे ठरवले. गावातील लोक तेव्हा जे गेले, ते आतापर्यंत परतलेच नाहीत.

जैसलमेर संस्थानातील दिवाण सलीम सिंग याची हवेली आजही जैसलमेरमध्ये आहे, पण ती पाहायला कोणी जात नाही. कुलधारा गावात बांधलेली दगडी घरे आता हळूहळू मोडकळीस आली आहेत.