अवकाशातून कोसळलं संकट, छत तोडून थेट बेडरूममध्ये पडलं; कुटुंब दहशतीत, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 01:21 PM2023-05-12T13:21:30+5:302023-05-12T13:26:04+5:30

वातावरण बदलामुळे सध्या अनेक नैसर्गिक गोष्टी अनियमितपणे घडताना दिसतात. घरातील बेडरूममध्ये छप्पर तोडून एक दगड अचानक कोसळल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. सुरुवातीला कुणालाही काहीच समजले नाही.

परंतु जेव्हा तज्ज्ञांनी याची पाहणी केली तेव्हा हा दगड जवळपास ५ अब्ज जुना उल्कापिंड असल्याचे समोर आले. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील हे प्रकरण आहे. या घटनेबाबत आता होपवेल पोलिसांनी निवेदन जारी केले आहे.

पोलिसांनी सांगितले की, धातूसारखी दिसणारी वस्तू जी उल्का असल्याचं मानलं जात आहे. ती वस्तू घराच्या छतावर आदळली आणि नंतर छप्पर तोडून थेट बेडरूममध्ये पडली. तब्बल ४ ते ६ इंच उंच आणि सुमारे १.८ किलो वजनाचा हा धातू आहे.

सीबीएस न्यूजनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास उल्का घराच्या छतावर पडली. घरची मालकीण सुजी कॉप म्हणाली, हा दगड घराचे छत तोडून थेट बेडरूममध्ये पडला. सुरुवातीला कोणीतरी दगडफेक केली असावी असे वाटले. मात्र मी वर पाहिले असता छत तोडून खाली आल्याचे समजले. त्यावेळी तिथे कोणी नव्हते ही नशीबाची गोष्ट होती.

फ्रँकलिन इन्स्टिट्यूटचे मुख्य खगोलभौतिकशास्त्रज्ञ डेरिक पिट्स म्हणाले की, ५ अब्ज वर्ष जुनी उल्का सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील अवशेष असू शकते. हा आतापर्यंत अवकाशात फिरत होता आणि आता पृथ्वीवर पडला आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, उल्का पाऊस Eta Aquarids Meteor shower गेल्या आठवड्याच्या शेवटी सातत्याने होत होता. त्यामुळेच हा उल्का दगड पृथ्वीवर पोहोचला असावा असं तज्त्रांनी म्हटलं.

घरात पडलेल्या या उल्कापिंडाचे तज्ज्ञांकडून परीक्षण केल्यानंतर त्यातून किरणोत्सर्ग तर पसरत नाही ना, याची पडताळणी करण्यात आली. याबाबत अग्निशमन विभागाने कोणताही धोका नसल्याला दुजोरा दिला आहे.

माहितीनुसार, जेव्हा जेव्हा उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते तेव्हा घर्षण आणि तीव्र तापमानामुळे ती जळते. बहुतेक उल्का पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे जळतात आणि हवेतच नष्ट होतात. परंतु ज्या उल्का पूर्णपणे जळत नाहीत, त्यांचा उरलेला भाग पृथ्वीवर पडतो.

उल्कावर्षाव काही ठरविक काळातच दिसतात. आपल्या अवकाशात बर्फ, लहान लहान दगड, खडक असतात. धूमकेतूने सोडलेले डेब्रीस (कचरा) असतात. हे गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जातात.

आपल्या वातावरणाबाहेर पोकळी असल्याने जेव्हा वातावरणात शिरतात तेव्हा त्यांचे माध्यम बदलते आणि त्यामुळे घर्षण निर्माण होते. घर्षण झाले की हे कण किंवा दगड पेट घेतात.