Petrol-Diesel:कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 09:52 PM2022-02-27T21:52:44+5:302022-02-27T22:01:13+5:30

Petrol-Diesel: भारतासारख्या प्रचंड प्लास्टिक कचरा असलेल्या देशात पेट्रोल आणि डिझेल सहज तयार करता येईल.

पेट्रोल-डिझेल कच्च्या तेलापासून तयार केले जाते, हे तुम्हाला माहितच असेल. पण, आता एका नव्या शोधानंतर कचऱ्यापासून पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती केली जात आहे.

नवल वाटेल पण, या प्रयोगातून एक-दोन लिटर नव्हे, तर दररोज तब्बल 600 ते 700 लिटर पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन घेतले जात आहे.

आफ्रिकन देश झांबियाने ही अशक्य गोष्ट करुन दाखवली आहे. जुने टायर आणि प्लास्टिकच्या डब्यांपासून पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती केली जात आहे.

झांबियातील सेंट्रल आफ्रिकन रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन दररोज 1.5 टन कचऱ्यापासून 600-700 लिटर डिझेल आणि पेट्रोलचे उत्पादन करत आहे.

देशातील पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी करणे हा कंपनीचा उद्देश आहे. झांबियामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून कचऱ्यापासून पेट्रोल आणि डिझेल तयार केले जात आहे.

या उपक्रमामुळे पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी होऊन देशातील प्लास्टिक आणि रबर कचरा कमी करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

रबरी टायर आणि प्लास्टिकचे डब्बे मोठ्या अणुभट्टीमध्ये उच्च तापमानात जाळले जातात. त्यात काही रसायन टाकून पेट्रोलियम इंधन तयार केले जाते.

झांबियास्थित कंपनी सेंट्रल आफ्रिकन रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुलेंगा म्हणतात की, जर आम्ही आमची पूर्ण क्षमता वापरली तर आम्ही देशातील 30 टक्के इंधनाची गरज भागवू शकतो.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, 25 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशात इंधन आयात करण्यासाठी दरवर्षी $1.4 अब्ज खर्च केले जात आहेत. झांबियामध्ये दररोज 14 कोटी लिटर तेल वापरले जाते.

जगातील अनेक देशांमध्ये वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणाला अनेक प्रकारे धोका निर्माण होत आहे. एका अंदाजानुसार, जगात सुमारे 8.3 अब्ज टन प्लास्टिक आहे. त्याचा वापर पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी केला तर जगभरातून कचरा निघून जाईल.

हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतासारख्या देशात जिथे प्लास्टिकचा प्रचंड कचरा आहे तिथे पेट्रोल आणि डिझेल सहज तयार करता येईल.