rare sea angel spotted in white sea russia kkg
रशियाजवळच्या समुद्रात दिसला 'जलपरी'सारखा दुर्मीळ जीव; फोटोंची जगभरात चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:51 PM2020-05-11T13:51:57+5:302020-05-11T14:02:22+5:30Join usJoin usNext समुद्रात विविध प्रकारचे जीव पाहायला मिळतात. समुद्रात एक वेगळंच जग पाहायला मिळतं. जगप्रसिद्ध अंडरवॉटर फोटोग्राफर अलेक्झांडर सेमेनोव यांनी अशाच एका वेगळ्या जीवाचा व्हिडीओ चित्रित केला आहे. अलेक्झांडर सेमेनोव यांनी चित्रित केलेला जीव एखाद्या जलपरीसारखा दिसतो. रशियाजवळच्या पांढऱ्या समुद्रात हा जीव पाहायला मिळाला. हा जीव अतिशय दुर्मिळ आहे. सी एंजल नावानं ओळखल्या जाणाऱ्या या जीवाला शास्त्रीय भाषेत क्लेड जिम्नोसोमाटादेखील म्हटलं जातं. ग्रीक भाषेत जिम्नोचा अर्थ नग्न, तर सोमाचा अर्थ शरीर असा होतो. या जीवाचं शरीर पारदर्शक असल्यानं त्याला हे नाव देण्यात आलं. अलेक्झांडर यांनी काढलेले सी एंजलचे फोटो अँटोनियो पॅरिस यांनी ट्विट केले आहेत. माशांचे फोटो काढण्यासाठी अलेक्झांडर पांढऱ्या समुद्रात गेले होते. त्यावेळी त्यांना एका सी एंजलचं दर्शन घडलं. त्यांनी सी एंजलचा व्हिडीओ चित्रित केला आणि काही फोटोदेखील काढले. सी एंजल एकटीच समुद्रात पोहोण्याची मजा लुटत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सी एंजल पोहोत असताना तिच्यामधून एक प्रकारचा प्रकाश बाहेर पडतो. सी एंजल एखादी परी डोक्यावर मुकूट परिधान केल्यासारखी दिसते. सी एंजल जैववैद्यकीय भाषेतल्या टेरोपॉड्स प्रकारात मोडते. सर्वसामान्य भाषेत सी एंजलला सागरी फुलपाखरूदेखील म्हटलं जातं. सी एंजलची लांबी फार नसते. सी एंजलचं शरीर जास्तीत जास्त ५ सेंटीमीटरचं असतं. तिचं शरीर जेलीसारखं पारदर्शक असतं. सी एंजल ताशी ३५४ मीटरपर्यंत पोहते. बर्फाळ भागात समुद्राखाली गरम पाणी असलेल्या ठिकाणी सी एंजल आढळून येतात. सी एंजल्स एकाच ठिकाणी मोठ्या संख्येनं मुक्काम करतात. एक क्युबिक मीटरमध्ये ३०० सी एंजल पाहायला मिळतात. सी एंजल्स ध्रुवीय प्रदेशांमधल्या समुद्रात अतिशय खोलवर आढळून येतात. त्यांच्या शिकार करण्याची पद्धतही वेगळी असते. काही सी एंजल्स भक्ष्याची वाट पाहून लपून बसतात आणि अचानक हल्ला करतात. तर काही सी एंजल्स भक्ष्याचा पाठलाग करून शिकार करतात.