...म्हणून रतन टाटांनी आपल्या कुत्र्याचं नाव ठेवलं 'गोवा'; अन् सांगितला गमतीदार किस्सा

By manali.bagul | Published: November 19, 2020 06:44 PM2020-11-19T18:44:26+5:302020-11-19T18:55:50+5:30

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असतात. रतन टाटांचे प्राण्यांवर प्रेम आहे. खासकरून त्यांना कुत्रे खूप जास्त आवडतात. याबाबत तुम्हालाही कल्पना असेल. टाटा ग्रुपचे ग्लोबल हेडक्वार्टर म्हणजेच बॉम्बे हाउसचा काही भाग रस्त्यावरील कुत्र्यांसाठी तयार केला आहे.

या कुत्र्यांमधील सगळयात लोकप्रिय असा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कुत्रा आहे. ज्याचं नाव गोवा आहे. असं म्हणतात की, गोवा रतन टाटांचा सगळ्यात आवडता कुत्रा आहे. रतन टाटा या कुत्र्याला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

रतन टाटांनी याआधीही दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये रतन टाटा गोवासह इतर कुत्र्यांबरोबर दिसून आले होते. यांनी या पोस्टमध्ये आपल्या कुत्र्याचे नाव गोवा का ठेवलं याचा खुलासा केला आहे.

८२ वर्षांच्या रतन टाटांना कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने विचारलं होतं की, या कुत्र्याचे नाव गोवा असं कशावरून ठेवण्यात आलं. तेव्हा टाटांनी सांगितले की, जेव्हा हे कुत्र्याचे पिल्लू लहान होते तेव्हा इकडे तिकडे फिरत होते. त्यानंतर ते माझ्या सहकाऱ्याच्या गाडीत येऊन बसले आणि त्यानंतर बॉम्बे हाऊसपर्यंत येऊन थांबले. हा कुत्रा गोव्यावरून आमच्या सोबत आला होता. म्हणून त्याचे नाव गोवा ठेवले.

जवळपास एका वर्षापूर्वी रतन टाटांनी आपलं इस्टाग्राम अकाऊंट तयार केलं होतं. या अकाऊंटवर रतन आपले जुने फोटो आणि आठवणी शेअर करतात. आतापर्यंत या अकाऊंटवर ३ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.