भारतातील असं एक मंदिर जिथे घरातून पळालेल्या प्रेमीयुगुलांना दिलं जातं संरक्षण, कुणीच काही करू शकत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 02:08 PM2022-02-16T14:08:17+5:302022-02-16T14:14:08+5:30

Shangchul Mahadev Temple : शंगचुल महादेव मंदिर कुल्लू क्षेत्र सॅंज घाटीत आहे. इथे महाभारत काळातील अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. त्याचाच भाग हे मंदिर आहे. हे मंदिर लाकडापासून तयार केलेलं आहे

भारत हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो. हजारो मंदिरं लोकांची श्रद्धा स्थानं आहेत. पण ही मंदिर केवळ पूजेसाठीच नाही तर त्यांच्या परंपरा आणि कथांसाठीही लोकप्रिय आहेत. असंच एक मंदिर आहे शंगचुल महादेव मंदिर(Shangchul Mahadev Temple). हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या शांगढ गावात बनलेलं हे मंदिर घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलांसाठी आश्रय स्थान आहे.

शंगचुल महादेव मंदिर कुल्लू क्षेत्र सॅंज घाटीत आहे. इथे महाभारत काळातील अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. त्याचाच भाग हे मंदिर आहे. हे मंदिर लाकडापासून तयार केलेलं आहे. आजूबाजूला जंगल आहे. सोबतच हिमालयन नॅशनल पार्कही आहे.

या मंदिराबाबत सांगितलं जातं की, इथे प्रेमी युगुलांना आश्रय दिला जातो. म्हणजे जर कुणी कपल आपल्या घरातून पळाले तर इथे लग्न करण्यासाठी येतात. येथील देव त्यांची रक्षा करतो. इथे कुणाचीही जात-धर्म पाहिला जात नाही. जे कुणी इथे येतात, त्यांची रक्षा केली जाते. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली जाते.

एकदा का इथे प्रेमी युगुल पोहोचले तर सगळी जबाबदारी गावातील लोक घेतात. इथे पोलिसही काही हस्तक्षेप करू शकत नाहीत. इतकंच काय तर वन विभाग आणि पोलीस जे इथे तैनात आहेत ते मैदानातून जाताना आपली टोपी काढतात.

इथे काही नियम आहेत ज्यांचं पालन सर्वांना करावं लागतं. कुणीही व्यक्ती इथे दारू, सिगारेटचं सेवन करत नाही. कुणीही इथे चामड्याची वस्तू नेऊ शकत नाही. इथे घोड्याच्या एन्ट्रीवरही मनाई आहे. जोरात कुणी बोलू शकत नाही. इथे भांडणही होत नाही.

जोपर्यंत समाज आणि समुदायाच्या रिती-रिवाजांना तोडून लग्न करणारे प्रेमीयुगुलांच्या प्रकरणाचा निपटारा होत नाही. तोपर्यंत त्यांना तेथून कुणीच हटवू शकत नाही. मंदिराचे पुजारी, ब्राम्हण त्यांची सुरक्षा करतात.

पौराणिक कथेनुसार, इथे पांडवांनी शरण घेतली होती. असं म्हणतात की, अज्ञातवासात दरम्यान पांडव इथे थांबले होते. यादरम्यान कौरव त्यांचा पाठलाग करत इथे पोहोचले होते. तेव्हा शंगचुल महादेवने कौरवांना रोखलं होतं आणि सांगितलं होतं की, हे माझं क्षेत्र आहे. जे कुणी माझ्या आश्रयाला येतील त्यांना कुणी काही करू शकत नाही. महादेवाच्या भीतीने कौरव परत गेले होते.

तेव्हापासून आतापर्यंत जेव्हाही कुणी समाजाने नाकारलेले लोक किंवा प्रेमीयुगुल इथे येतात त्यांची सुरक्षा केली जाते. त्यांचाच निर्णय मान्य केला जातो. हे मंदिर नेहमीच उघडं असतं.