जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 03:38 PM 2019-01-08T15:38:57+5:30 2019-01-08T15:46:38+5:30
जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना ‘एएलएस’ आजाराने ग्रासले होते. मात्र, असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या आजारपणावर मात करत ख्यातनाम शास्त्रज्ञ अशी ख्याती जगभर मिळवली.
‘एएलएस’ आजाराने ग्रासले, शारीरिक अपंगत्त्व आल्यामुळे हालचालींवर बंधनं आली, कायमस्वरूपी खुर्चीला खिळून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र, आपल्या शारीरिक अपंगत्त्वाला त्यांनी कधीच यशाच्या मार्गातला अडसर बनू दिला नाही. आपल्या व्हिलचेअरलाच आपली ताकद मानली.
स्टीफन हॉकिंग यांचा ‘प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग युनिव्हर्स’ हा प्रबंध केंब्रिजने ऑनलाइन प्रसिद्ध केला होता. त्यानंतर हा प्रबंध इतका हिट झाला की जगभरातील लाखो लोकांनी प्रकाशित होताच तो डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला आणि केंब्रिजची वेबसाईट अक्षरश: क्रॅश झाली होती.
ब्रम्हांडातल्या अनेक गुढ गोष्टींची उकल करणाऱ्या या शास्त्रज्ञाला जेव्हा एका मुलाखतीत विश्वातील सर्वात गुढ गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला होता तेव्हा ‘स्त्री’ ही जगातील सर्वात गूढ गोष्ट असल्याचे मत त्यांनी मांडले होते.
स्टीफन हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठातून गणित विषयात डिग्री मिळवायची होती पण याठिकाणी गणिताची डिग्री नसल्याने त्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांची निवड केली आणि त्यामध्ये सहजपणे डिग्री मिळवली.
स्टीफन हॉकिंग यांना 12 छोट्या मोठ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ज्यामध्ये अलबर्ट आइन्स्टाइन पुरस्काराचा(1978) समावेश आहे.
स्टीफन हॉकिंग यांच्या ‘A BRIEF HISTORY OF TIME’ या पुस्तकाने जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यांना पुस्तके वाचायची आणि लिहायची खूप आवड होती. शाळेत असताना स्टीफन हॉकिंग ‘आइनस्टाइन’ या टोपन नावाने ओळखले जात होते.