Viral News: दक्षिण आफ्रिकेत आहे रहस्यमयी सरोवर, पाणी पिताच होतो मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:10 PM2022-02-17T12:10:28+5:302022-02-17T12:14:33+5:30

पृथ्वीवर अनेक रहस्ये आहेत, असेच एक रहस्य दक्षिण आफ्रिकेत असलेल्या सरोवराबाबतही आहे. हे सरोवर जेवढे सुंदर आहे तेवढेच लोक त्याचे पाणी प्यायला घाबरतात.

पृथ्वीवर पर्वत, नद्या, तलाव आणि इतर अनेक ठिकाणी रहस्य दडले आहेत. या रहस्यांबद्दल आजही मानवाला काहीही माहिती नाही. मानवाने अनेकदा या रहस्यांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, पण हाती नेहमीच निराशा आलीये. आज आम्ही अशाच एका रहस्यमय तलावाबद्दल सांगणार आहोत.

जगात हजारो सरोवरे आहेत, पण त्यापैकी काही अशी आहेत, ज्यांचे रहस्य आजपर्यंत माणसाला कळू शकलेले नाही. आज आम्ही दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो राज्यात असलेल्या रहस्यमयी 'फुंडुजी' सरोवराबद्दल सांगणार आहोत. हे सरोवर दिसायला खूप सुंदर आहे आणि त्याचे पाणीही खूप स्वच्छ आहे. पण हे पाणी पिण्यासाठी अतिशय घातक आहे. या सरोवराचे पाणी पिताच मृत्यू होतो.

पुरातन काळात मुतली नदीचा प्रवाह थांबल्याने आणि भूस्खलनामुळे या तलावाची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. पण, या तलावाचे पाणी पिल्याने मृत्यू का होतो, हे आजही एक रहस्य आहे. तलावाबद्दल अनेक स्थानिक विविध कथा सांगतात. प्राचीन काळी एक कुष्ठरोगी लांबच्या प्रवासानंतर या ठिकाणी आला होता. त्याने स्थानिक लोकांकडून जेवण आणि राहण्यासाठी जागा मागितली, पण त्याला कुणीही जवळ केले नाही.

यानंतर नाराज झालेल्या त्या कुष्ठरोगीने तेथील लोकांना शाप दिला आणि तलावात जलसमाधी घेतली आणि त्यामुळेच तलावाचे पाणी विषारी झाले, अशी कथा काही स्थानिक सांगतात.

काहीजण असे म्हणतात की, तलावाच्या आतून बुडालेल्या लोकांच्या ओरडण्याचे आणि ढोल-ताशांचे आवाज येत राहतात. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी स्थानिक लोक नृत्य महोत्सवाचे आयोजन करतात.

स्थानिक लोकांचे असेही म्हणणे आहे की, या तलावाचे संरक्षण डोंगरावरील एका महाकाय अजगर करतो. हा अजगर स्थानिक लोकांना त्रास देत नाही, म्हणून दरवर्षी लोक त्याला खूश करण्यासाठी नृत्य महोत्सवाचे आयोजन करतात.

असे म्हटले जाते की 1946 मध्ये अँडी लेविन नावाच्या व्यक्तीने तलावाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला होता. पाण्याचे सत्य जाणून घेण्यासाठी त्याने तलावातून पाण्याचे सँपल घेतले आणि परत निघाला.

जंगलातून परत जात असताना तो रस्ता चुकला आणि बराचवेळ चालूनही त्याला रस्ता सापडला नाही. शेवटी त्याने ते तलावाचे पाणी फेकून दिले आणि नंतर त्याला रस्ता सापडला. मात्र, घटनेच्या काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला.

यानंतरही अनेकांनी या तलावाचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी अपयश आले. हे पाणी प्यायल्यानंतर लोक का मरतात, याचा शोध आजपर्यंत कोणालाही लागलेला नाही.

काही लोकांचा असा विश्वास आहे की तलावात काही विषारी वायू सापडला असावा. मात्र, याचा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. हे पाणी विषारी असण्यामागचे नेमके कारण आजही एक मोठे रहस्य आहे.