'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत सलूनवाला, त्याच्याकडे आहेत ४०० लक्झरी गाड्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:44 PM 2021-08-31T15:44:03+5:30 2021-08-31T15:52:18+5:30
Barber Ramesh Babu : रमेश बाबू आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला सलूनचं काम शिकवतात. ते रोज त्यांना कटिंग टिप्स देतात. रमेश बाबू सांगतात की, ही एकप्रकारची नोकरीच आहे. रतन टाटा, मुकेश अंबानी, मार्क झुकरबर्गसारख्या मोठ्या व्यक्तींची नावे आज जगभरातील लोकांना माहीत आहेत. पण अशीही काही नावं अशी आहेत जी मोठी आहेत, पण फार कमी लोकांना माहीत आहेत. या लोकांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे. असंच एक नाव म्हणजे बंगळुरूचे रमेश बाबू. एकेकाळी ते एक सामान्य न्हावी होते. पण त्यांच्या दूरदृष्टीने, मेहनतीने आणि इच्छाशक्तीने ते अब्जावधी रूपयांचे मालक आहेत. त्यांच्याकडे रोल्स रॉयस, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या लक्झरी कार्स आहेत.
रमेश बाबू यांचं वय ४९ वर्षे आहे. बंगळुरूच्या अनंतपूरमध्ये राहणारे रमेश बाबू जेव्हा ७ वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे वडील वारले होते. वडील बंगळुरूतील चेन्नास्वामी स्टेडियमजवळ हेअर सलून चालवत होते. वडिलांच्या निधनानंतर रमेश बाबू यांच्या आईने लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम केलं. जेणेकरून तीन मुलांचं पोट भरता यावं. त्यांनी वडिलांचं दुकान केवळ ५ रूपये महिना भाड्याने दिलं होतं.
रमेश बाबू अनेक अडचणी असूनही शिक्षण घेत राहिले. १२व्या वर्गात फेल झाल्यावर त्यांनी इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून इले्क्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा घेताल. १९८९ मध्ये त्यांनी वडिलांचं दुकान परत घेतलं आणि ते नव्याने सुरू केलं. हे दुकान मॉडर्न बनवून भरपूर पैसा कमावला आणि एक मारूती व्हॅन खरेदी केली. त्यांना कार चालवता येत नव्हती म्हणून त्यांनी कार भाड्याने देणं सुरू केलं. २००४ मध्ये त्यांनी त्यांची टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल कंपनी सुरू केली.
आज रमेश बाबू यांच्याकडे ४०० कार्स आहेत. यात ९ मर्सिडिज, ६ बीएमडब्ल्यू, एक जगुआर आणि तीन ऑडी कार आहेत. ते रोल्स रॉयससारखी महागडी कार चालवतात. ज्याचं एक दिवसाचं भाडं ५० हजार रूपये आहे. रमेश बाबू यांच्याकडे ९० पेक्षा जास्त ड्रायव्हर्स आहेत. आजही त्यांनी त्यांचा पारंपारिक व्यवसाय सोडला नाही. ते आजही वडिलांचं सलून इनर स्पेस चालवतात. ज्यात ते दररोज २ तास ग्राहकांचे केस कापतात.
लक्झरी टॅक्सी सुरू केल्यानंतर रमेश बाबू यांच्या क्लाएंटची लिस्ट वाढली. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चनपासून ते शाहरूख खानपर्यंत सेलिब्रिटीही त्यांचे क्लाएंट आहेत. रमेश बाबू सकाळी ५ वाजता आपल्या गॅरेजमध्ये जातात. तिथे गाड्यांची देखरेख, बुकिंगची माहिती घेऊन १० वाजता ऑफिसमध्ये पोहोचतात. त्यानंतर ५ -६ वाजता ते त्यांच्या सलूनवर जातात. इथेही त्यांचे खास क्लाएंट त्यांची वाट बघत असतात. रमेश बाबू यांच्यानुसार, त्यांचे जास्तीत जास्त क्लाएंट केस कापण्यासाठी कोलकाता आणि मुंबईहून येतात.
रमेश बाबू आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला सलूनचं काम शिकवतात. ते रोज त्यांना कटिंग टिप्स देतात. रमेश बाबू सांगतात की, ही एकप्रकारची नोकरीच आहे. ज्यात प्रोफेशनल असणं गरजेचं आहे. ते त्यांना सलूनमध्ये सोबत घेऊन जातात. पण ते लहान असल्याने ते तिथे काम करू शकत नाहीत.
रमेश बाबू यांचं टार्गेट दुसऱ्या शहरांमध्ये आपला बिझनेस वाढवणं हा आहे. ते त्यांचं सलून आणि टॅक्सी सर्व्हिस विजयवाडाहून सुरू करण्याचा विचार करत आहेत. ते मानतात की, अशा शहरात संधी जास्त आहेत. हैद्राबादसारख्या शहरात बिझनेसला यश मिळायला वेळ लागतो. पण छोट्या शहरात तुमच्याकडे अनेक पर्य़ाय असतात.