The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:08 PM 2022-02-02T13:08:13+5:30 2022-02-02T13:16:55+5:30
The Great Khali net worth : द ग्रेट खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ ला हिमाचल प्रदेशाील सिरमौरमध्ये झाला होता. त्याचं खरं नाव दिलीप सिंह राणा असं आहे. जगभरात तो द ग्रेट खली नावाने प्रसिद्ध आहे. द ग्रेट खली माहीत नाही अशी व्यक्ती भारतात क्वचितच सापडेल. आज ज्याप्रकारे खलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं आणि जसं यश मिळवलं तो देशातील तरूणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. अनेक अडचणींवर मात करत त्याने मोठा पल्ला गाठला आहे. ग्रेट खली आज लोकप्रियही आहे श्रीमंतही आहे.
द ग्रेट खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ ला हिमाचल प्रदेशातील सिरमौरमध्ये झाला होता. त्याचं खरं नाव दिलीप सिंह राणा असं आहे. जगभरात तो द ग्रेट खली नावाने प्रसिद्ध आहे. दिलीप एका गरिब परिवारातून आहे. तो बालपणापासून Acromegaly आणि Gigantism सारख्या गंभीर आजारांनी पीडित आहे. Acromegaly मध्ये व्यक्ती बोलू शकत नाही. तर Gigantism ने पीडित व्यक्तीची उंची अधिक वाढू लागते. गरिब परिवारातील असल्याने तो फार जास्त शिक्षण घेऊ शकला नाही. १२ वर्षीय वयात जेव्हा लहान मुलं शाळेत जात होते तेव्हा खली मजुरी करत होता.
९०च्या दशकात दिलीप सिंह कामासाठी हिमाचल प्रदेशातून पंबाजमध्ये आला. यादरम्यान पंजाब पोलिसातील एका अधिकाऱ्याने दिलीप सिंहला ट्रकमध्ये एका हाताने जड साहित्य भरताना पाहिलं. त्यांनी त्याला पंबाज पोलिसात नोकरीची ऑफर दिली. पंजाब पोलिसांच्या मदतीने त्याने २००० मध्ये आपल्या व्यावसायिक कुस्तीला सुरूवात केली. दिलीप सिंह राणा बॉडीबिल्डींगमध्ये १९९७ आणि १९९८ मध्ये मिस्टर इंडिया राहिला होता.
द ग्रेट खलीच्या जीवनावर पुस्तकही लिहिलं गेलं आहे. यात सांगण्यात आलं की, जेव्हा तो शाळेत जात होता तेव्हा त्याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नसायचे. तेव्हा शाळेची फी केवळ अडीच रूपये होती. त्यामुळे त्याला १९७९ मध्ये शाळेतून काढण्यात आलं होतं. त्यानंतर तो कधीच शाळेत जाऊ शकला नाही.
द ग्रेट खली WWE मध्ये खेळणारा भारतातील पहिला खेळाडू आहे. त्याने २००६ मध्ये WWE Universe मधून डेब्यू केलं होतं. यानंतर द ग्रेट खली २००७ मध्ये वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन बनला. यादरम्यान रिंगमध्ये द अंडरटेक, जॉन सीना, केन, बिग शोसहीत अनेक दिग्गजांना धुल चारली होती. द ग्रेट खलीने WWE मधून आता रिटायरमेंट घेतली आहे.
द ग्रेट खलीची कहाणी फारच प्रेरणादायी आहे. द ग्रेट खलीकडे आज संपत्तीची कमतरता नाही. आज त्याच्याकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती आहे आणि तो ऐशाआरामात जीवन जगत आहे. तो वेगवेगळ्या सोर्समधून वर्षाला साधारण ७ ते ८ कोटी रूपये कमाई करतो. सद्या द ग्रेट खलीची नेटवर्थ ४५ कोटी रूपयांच्या आसपास आहे.
द ग्रेट खली अनेक हॉलिवूड आणि काही बॉलिवूड सिनेमात दिसला आहे. त्यासोबतच कलर्सवरील बिग बॉस शोमध्येही दिसला आहे. द ग्रेट खली आतापर्यंत ४ हॉलिवूड, २ बॉलिवूड सिनेमात आणि काही टीव्ही शोमध्ये दिसला आहे. सिनेमे आणि टीव्हीवरून त्याने साधारण २० कोटी रूपयांची कमाई केली आहे.
द ग्रेट खली जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो. सध्या तो Unlu, Ambuja Cement, Maithan Steel च्या जाहिरातींमध्ये दिसतो. ब्रॅन्ड एंडोर्समेंटमधून खली साधारण १५ ते १६ कोटी रूपयांची कमाई करतो. द ग्रेट खली प्लास्टिक मुक्त हिमाचल प्रदेशचा ब्रॅन्ड अॅंबेसेडर आहे.
द ग्रेट खलीकडे आज अमेरिकन नागरिकताही आहे. रिपोर्टनुसार अमेरिकेत त्याच्याकडे एक आलिशान बंदला आहे. ज्याची किंमत २० कोटी रूपयांच्या आसपास आहे. त्यासोबतच पंजाब आणि हिमाचलमध्येही त्याचा एक एक बंगला आहे. ज्यांची किंमत १० कोटी रूपयांच्या आसपास आहे.
द ग्रेट खली १३ नोव्हेंबर २०१४ ला WWE सोबत कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर अमेरिका सोडून भारतात आला. नंतर २०१५ मध्ये पंजाबच्या जालंधरमधील कंगनीवाल गावात आपली कुस्ती अकॅडमी सुरू केली. याद्वारे तो गरिब आणि गरजू तरूणांना रेसलिंगचं फ्री ट्रेनिंग देतो. ४९ वर्षीय द ग्रेट खलीचं लग्न झालं आहे. त्याच्या पत्नीचं नाव हरमिंदर कौर आहे. खली आणि हरमिंदरची एक मुलगीही आहे. द ग्रेट खलीचा २०२१ मध्ये WWE हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित केलं होतं.