देशातील सर्वात लहान रेल्वे मार्ग महाराष्ट्रात; फक्त ३ किमीसाठी १२५५ रु तिकीट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 01:46 PM2023-06-09T13:46:04+5:302023-06-09T13:49:55+5:30

भारतातील कुठल्याही भागात तुम्ही फिरण्याचा प्लॅन बनवला असेल तर सर्वात आधी हेच पाहिले असेल की त्याठिकाणी ट्रेनची सुविधा आहे की नाही. भारतात रेल्वे प्रवास सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा मानला जातो.

देशातील रेल्वे नेटवर्क जवळपास ६७ हजार किमीहून अधिक आहे. त्याचमुळे जगातील चौथा सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क भारत बनला आहे. देशभरात रोज हजारोने ट्रेन धावतात आणि रेल्वे प्रवास हा कुठल्याही एका वर्गासाठी नसून प्रत्येक माणसासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा ट्रेनबाबत सांगणार आहोत जिथे देशातील सर्वात लहान ट्रेन प्रवास होतो. इतकेच नाही तर ही ट्रेन केवळ ३ किमी चालते. ऐकून आश्चर्य वाटले ना..पण हे खरे आहे. देशातील सर्वात छोटा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील नागपूरहून अजनी इथं जातो.

परंतु या ३ किमीचा रेल्वे प्रवास तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी प्रवाशांना १२५५ रुपये मोजावे लागतात. ट्रॅव्हल वेबसाईटनुसार, नागपूर ते अजनी हा रेल्वे प्रवास ९ मिनिटांचा आहे. या प्रवासाचा जनरल क्लास तिकीट ६० रुपये आहे.

स्लीपर क्लासचा प्रवास १७५ रुपये आहे. तर एसी ३ क्लासचा प्रवास ५५५ रुपये, एसी २ चे तिकीट ७६० आणि एसी १ चे तिकीट १२५५ रुपये इतके आहे. अजनी रेल्वे स्टेशनवर आणखी एक रंजक गोष्ट आहे.

याठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी महिलाच आहे. अजनी रेल्वे स्टेशनवर एकूण २२ महिला कर्मचारी तैनात आहेत. त्यात स्टेशन मास्टरसह ६ व्यावसायिक लिपिक, ४ तिकीट तपासनीस, ४ कुली, ४ सफाई कामगार आणि ३ रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचारी.

या स्टेशनवर अनेक गाड्यांना सुमारे २ मिनिटे थांबा आहे. हे स्थानक प्रामुख्याने नागपूर मध्य, पश्चिम, दक्षिण-पश्चिम येथील रहिवासी दररोज वापरतात. नागपूरला शेवटचा स्टॉप असणाऱ्या रेल्वे येथे ८० टक्क्यांहून अधिक रिकाम्या असतात.

सर्वात महिला कर्मचारी असलेल्या अजनी रेल्वे स्थानकापूर्वी मुंबईतील माटुंगा आणि जयपूरमधील गांधीनगर स्थानकांवर अधिक महिला कर्मचारी होत्या.

टॅग्स :रेल्वेrailway