क्रिकेटच्या मैदानातच नव्हे अभिनयातही षट्कार मारलाय या दिग्गज खेळाडूंनी, पाहा कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 06:50 PM2022-02-27T18:50:12+5:302022-02-27T19:13:04+5:30

बॉलिवूड आणि क्रिकेटचं एक वेगळंच नातं आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत जे अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांच्यासोबत संसार थाटला. तर काही क्रिकेटपटू असेही आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. यामध्ये अनुभवी क्रिकेटर्स सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि युवराज सिंह यांचा समावेश आहे.

ऑलराऊंडर क्रिकेटर युवराज सिंहसुद्धा चित्रपटात झळकला आहे. परंतु त्यावेळी तो केवळ 11 वर्षांचा होता. त्याने एका पंजाबी चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

भारतासाठी एक कसोटी आणि 20 वन डे सामने खेळणाऱ्या सलील अंकोला यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरसोबत त्यांनी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. परंतु त्या सामन्यात त्यांनी केवळ 6 धावा काढल्या होत्या. आणि 2 विकेट घेतल्या होत्या.सलील अंकोला यांनी 'कुरुक्षेत्र', 'पिता' आणि 'चूरा लिया है तुमने' या हिंदी चित्रपटात काम केले आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले आहेत.

भारताच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेले अनिल कुंबळेसुद्धा एका हिंदी चित्रपटात दिसले आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक कुंबळे अनुपम खेर आणि मंदिरा बेदी यांच्या 2008 मध्ये आलेल्या मीराबाई नॉट आउट या चित्रपटात दिसले होते.

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आणि माजी प्रशिक्षक संदीप पाटील यांनीही हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावलं आहे. 'कभी अजनबी थे' या चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लनसोबत काम केलं आहे.

दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनीही एका मराठी चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाचं नाव होतं 'सावली प्रेमाची'. याशिवाय नसीरुद्दीन शाह स्टारर 'मालामाल' या हिंदी चित्रपटातही ते पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते.

भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने भारताकडून 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. तसेच हरभजनने तमिळ चित्रपट “फ्रेंडशिप” मध्ये देखील काम केले आहे. या सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारत आहे आणि विशेष म्हणजे यात तो जबरदस्त अ‍ॅक्शन करताना देखील दिसत आहे. अर्जुन, लोसलिया यांनीही या तामिळ चित्रपटात काम केले आहे. तो यापूर्वी ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटातही छोट्या भूमिकेत दिसला होता.

माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपला मोर्चा चित्रपट क्षेत्राकडे वळवला आहे. इरफानने ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटात काम केले आहे. अजय ज्ञानमुथु दिग्दर्शित हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांचे जिवलग मित्र व माजी खेळाडू विनोद कांबळी यांनीही चित्रपटात काम केले आहे. त्यांनी 2002 साली रिलीज झालेल्या ‘अनर्थ’ चित्रपटात अभिनय केला होता. त्या चित्रपटात त्यांच्यासमवेत संजय दत्त आणि सुनील शेट्टी देखील होते.

भारतीय संघाला आपल्या नेतृत्वात 1983 साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकवणारे दिग्गज अष्टपैलू कपिल देव हे देखील चित्रपटात दिसले आहेत. ‘इक्बाल’ आणि ‘आर्यन’ यासारख्या काही चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केलेली आहे. त्यांच्याच बायोपिक 83 मध्ये कॅमिओ रोल केला आहे.

क्रिकेटवर आधारलेल्या ‘बाळा’ चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत अजित आपल्याला दिसले होते.