भारतातील या नदीत पाण्यासोबत वाहतं सोनं, लोक येतात अन् सोनं घेऊन जातात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:16 IST2025-03-12T14:31:49+5:302025-03-12T15:16:08+5:30

Gold River : भारतात एक अशीही नदी आहे, ज्यात पाण्यासोबतच सोन्याचे कणही वाहतात. या कारणानं ही बघण्यासाठी लोक दूरदूरून येतात.

Gold River : भारतात अनेक नद्या आहेत. या नद्या लोकांच्या जगण्याचा भाग आहेत. कारण यातून प्यायला पाणी पिणं तर मिळतंच, सोबतच इतरही अनेक फायदे मिळतात. या नद्यांना भारतात खूप धार्मिक महत्वही असतं. तसेच भारतात एक अशीही नदी आहे, ज्यात पाण्यासोबतच सोन्याचे कणही वाहतात. या कारणानं ही बघण्यासाठी लोक दूरदूरून येतात.

पाण्यासोबत सोनं वाहणाऱ्या या नदीचं नाव स्वर्णरेखा नदी आहे. जी झारखंडमध्ये असून जवळपास ४७४ किलोमीटर लांब आहे. या नदीचा खासियत म्हणजे यात पाण्यासोबत सोन्याचे कणही वाहतात. त्यामुळे या नदीचं नाव स्वर्णरेखा देण्यात आलं. झारखंडसोबतच ही नदी उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये काही भागांमधून वाहते.

भू-वैज्ञानिकांचं मत आहे की, स्वर्णरेखा नदी खनिजे असलेल्या डोंगरांमधून वाहते. जेव्हा नदीचं पाणी या डोंगरांना भिडतं तेव्हा घर्षणामुळे सोन्याची बारीक कण पाण्यात पडतात आणि मग ते प्रवाहासोबत वाहत जातात. वैज्ञानिकांनुसार, ही प्रक्रिया पूर्णपणे नॅचरल आहे.

काही लोककथांनुसार, महाभारत काळात जेव्हा पांडव आपल्या वनवासादरम्यान या भागात आले होते. त्यावेळी एक दिवस पांडवांची माता कुंती यांना तहान लागली. पण आजूबाजूला कुठेच पाणी नव्हतं. तेव्हा माता कुंती यांनी आपल्या मुलांना पाणी आणण्यास सांगितलं. पण पाणी काही सापडलं नाही. माता कुंती यांनी अर्जुनाला पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितलं.

अर्जुनानं धनुष्यबाण मारत जमिनीतून पाणी काढलं. जमिनीतून येणाऱ्या या पाण्यासोबतच सोन्याचे कणही बाहेर येऊ लागले होते. तेव्हापासून या नदीला स्वर्णरेखा म्हटलं जातं.

आजही अशी मान्यता आहे की, या नदीच्या प्रवाहात वाहणारे सोन्याचे कण अर्जुनाच्या बाणामुळे तयार झाले होते. त्यामुळेच या नदीला पवित्र आणि दिव्य मानलं जातं. लोक ही नदी बघण्यासाठी मोठ्या संख्येनं रोज येतात.

नदीच्या पाण्यातील सोन्याचे कण गोळा करण्यासाठी लोक इथे मोठ्या संख्येने येतात. वेगवेगळी साधणं घेऊन लोक यातील सोन्याचे कण गोळा करतात आणि ते विकून घर चालवतात.