चिमुकल्या पेटीत निसर्ग साकारणारा अवलिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 16:36 IST2019-05-17T16:31:08+5:302019-05-17T16:36:07+5:30

चित्र म्हटलं की कॅनेव्हासवरील कलाकृती डोळ्यासमोर येते. अनेकांना भव्यदिव्य चित्र काढण्याची, पाहण्याची इच्छा असते. पण ओहियोतला रेमिंग्टन रॉबिन्सन नावाचा कलाकार लहान चित्रं काढतो.
लहानशा डब्यात अगदी व्यवस्थित बसेल, अशी चित्रं साकारणं ही रॉबिन्सनची खासियत. विशेष म्हणजे अगदी कमी वेळात तो ही चित्रं साकारतो. कॉफीचा आस्वाद घेतही तो सुंदर चित्र रेखाटतो.
लहान चित्र साकारत असताना अतिशय काळजी घ्यावी लागते. अतिशय सूक्ष्म निरीक्षण करुन ते कागदावर उतरवावं लागतं. रॉबिन्सनला ही कला अगदी उत्तम जमते.
एक लहानशी पेटी घ्यायची. त्यात वॉटर कलर ओतायचे. त्याच पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला समोर दिसणारं दृश्य साकारायचं, अशा पद्धतीनं रॉबिन्सननं उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे.
स्वित्झर्लंडसारख्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या देशात गेल्यावर अनेकजण तिथलं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करतात. पण रॉबिन्सन तिथे कलर आणि ब्रश घेऊन उत्तम चित्र साकारतो. निसर्गाची कलाकृती तो आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून छोट्याश्या डब्यात कैद करतो.
निसर्गाच्या जवळ जाऊन तो निसर्ग लहानशा डब्यात कैद करण्याच्या कलेनं रॉबिन्सन यांना प्रसिद्धी मिळवून दिली. इन्स्टाग्रामवर त्यांच्या चित्रांची खूप चर्चा होते.
निसर्गाचे विविध रंग, विविध छटा रॉबिन्सन यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या छोट्या डब्यात उतरवल्या आहेत. त्यांची ही कला जगावेगळी आहे.
आपल्या लहानशा डब्यात निसर्ग रेखाटणाऱ्या या अवलियाचं सोशल मीडियानं खूप कौतुक केलं आहे.