वर्षानुवर्षे गळ्यात धातुच्या कड्या घालुन फिरतात या स्त्रिया, यामागे आहे 'हे' विचित्र कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 05:33 PM 2021-11-08T17:33:08+5:30 2021-11-08T18:10:20+5:30
महिलांच्या गळ्यात धातूच्या कड्या अडकवण्याची विचित्र परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या शेजारील देशात पाळली जाते. म्यानमार आणि थायलंडच्या उत्तर भागात गेल्या अनेक \वर्षांपासून या परंपरेचं पालन होताना दिसतं. ही परंपरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. जाणून घेऊया या परंपरेमागे नेमकं काय कारण आहे? म्यानमार आणि थायलंडमधील अनेक आदिवासी जमातींमध्ये ही प्रथा आहे. महिलांच्या गळ्यात धातूच्या कड्या घातल्या जातात.
त्यामुळे महिलांची मान प्रमाणापेक्षा जास्तच उंच दिसते. जणू एखाद्या धातूच्या कड्यावर मान ठेवली आहे, असं या महिलांकडे पाहून वाटतं.
अनेक वर्षांपासून या प्रथेचं पालन केलं जात असून त्यामागे नेमकं काय आहे, याची कुणालाच नेमकी माहिती नाही.
या भागात काही वर्षांपूर्वी वाघांची संख्या मोठी होती. आदिवासी समाज हा जंगलात राहणारा असल्यामुळे त्यांना सतत वाघांच्या हल्ल्याची भीती असायची.
वाघ जेव्हा हल्ला करतो, तेव्हा सर्वप्रथम तो मानेचा घोट घेण्याचा प्रयत्न करतो. शिकार करताना मानेचा चावा घेऊन जीव घेण्याची वाघांची पद्धत असते. अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठीच ही प्रथा पडली असावी, असं काही अभ्यासक सांगतात.
वाघाच्या ताब्यात एखादी महिला सापडली तरी सहजासहजी वाघाला तिच्या गळ्याला जखम करता येऊ नये, या कारणासाठी या प्रथेचा उदय झाला असावा, असं सांगितलं जातं.
काही वर्षांपूर्वी जंगलांमध्ये अनेक लुटारू टोळ्या यायच्या आणि महिलांना घेऊन जायच्या. अशा प्रकारे मानेत कडे असतील, तर महिला कुरुप दिसतील आणि दरोडेखोर त्यांना घेऊन जाणार नाहीत, असाही एक विचार या प्रथमागे असल्याचं सांगितलं जातं.
लहान वयातच असे धातूचे कडे मुलींना घातले जातात. त्या जशा मोठ्या होतील, तसे हे कडे मानेभोवती आवळतात आणि कॉलरचं हाड त्यामुळे दबलं जातं.
या हाडाचा विकासच न झाल्यामुळे महिलांची मान सामान्यांपेक्षा अधिक उंच आणि विचित्र दिसते.
अनेक महिलांना या धातूच्या कड्यांमुळे जखमाही होत असल्याचं सांगितलं जातं.