महाराणी क्लिओपेट्राची कबर सापडली? संशोधकांनी प्राचीन मंदिराखाली शोधला 4800 फूट लांब बोगदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 03:30 PM2022-11-09T15:30:26+5:302022-11-09T15:37:47+5:30

सशोधकांना इजिप्तच्या प्राचीन तापोसिरिस मॅग्ना मंदिराखाली हा गाडला गेलेला बोगदा सापडला आहे. मंदिराच्या खालून बोगदा किंवा भूमिगत मार्ग सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इजिप्तमधील प्रसिद्ध महाराणी क्लियोपेट्राची समाधी एका मंदिराखाली असल्याचा दावा केला जातो. ही समाधी शोधण्यासाठी सुरू असलेल्या उत्खननादरम्यान एका मंदिराच्या 43 फूट खाली एक बोगदा सापडला आहे. हा बोगदा दगड कोरुन तयार करण्यात आला असून, याची लांबी तब्बल 4,800 फूट आहे.

सशोधकांना इजिप्तच्या प्राचीन तापोसिरिस मॅग्ना मंदिराखाली हा गाडला गेलेला बोगदा सापडला आहे. दगड कोरून हा बोगदा बनवण्यात आला असून, यात क्लियोपेट्राची हरवलेली कबर शोधली जाऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हा बोगदा 4,800 फुटांपेक्षा जास्त लांब आणि उंची सुमारे 6 फूट आहे. या बोगद्याची रचना सामोस या ग्रीक बेटावर सापडलेल्या युपलिनोसच्या बोगद्यासारखी आहे. युपलिनोस बोगदा ही प्राचीन जगाची सर्वात महत्त्वाची अभियांत्रिकी कामगिरी मानली जाते.

मंदिराच्या खालून बोगदा किंवा भूमिगत मार्ग सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सॅन डोमिंगो पुरातत्वशास्त्रज्ञ कॅथलीन मार्टिनेझ यांचा असा विश्वास आहे की, इजिप्तचे शेवटचे शासक क्लियोपेट्रा आणि तिचा प्रियकर मार्क अँटनी यांना इजिप्तमधील एका मंदिरात पुरण्यात आले आहे.

या बोगद्यातून त्यांच्या समाधीपर्यंत पोहोचता येऊ शकते. कॅथलीन म्हणतात की, बोगद्याजवळ राणीची कबर असण्याची 1% शक्यता असेल, तरीदेखील ते शोधणे माझे कर्तव्य आहे.

प्राचीन तापोसिरिस मॅग्ना मंदिर इजिप्शियन शहर अलेक्झांड्रियाजवळ आहे. इजिप्शियन शासक टॉलेमी II फिलाडेल्फस याने 280 ते 270 ईसापूर्व दरम्यान हे शहर वसवले होते. हे शहर मारियोटिस सरोवराजवळ होते. इजिप्त आणि लिबिया यांच्यातील व्यापारात या शहराचा महत्त्वाचा वाटा होता.

अलेक्झांड्रिया ही एकेकाळी इजिप्तची राजधानी होती. कॅथलीनने सांगितले की, बोगद्याजवळ राणी क्लियोपात्राची कबर असण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यांची कबर इथे सापडली, तर हा 21व्या शतकातील सर्वात मोठा शोध असेल.

मंदिराच्या 43 फूट खाली गाडला गेलेला हा बोगदा सापडल्यानंतर कॅथलीन योग्य मार्गावर आहेत, असा अनेकांना विश्वास आहे. मंदिराच्या आतून कॅथलीनने आणखी अनेक महत्त्वाचे शोध लावले आहेत.

यात राणी क्लियोपेट्रा आणि अलेक्झांडर द ग्रेट यांच्या प्रतिमा आणि नावे असलेली नाणी, अनेक शिरच्छेद केलेले पुतळे आणि देवी इसिसच्या पुतळ्यांचाही समावेश आहे.