एक असा जीव ज्याचे दात लोखंडाचे आहेत, दगड खाऊन करतो त्यांचा चुराडा.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 02:34 PM 2021-06-01T14:34:42+5:30 2021-06-01T14:40:51+5:30
सामान्यपणे दात कॅल्शिअमपासून तयार होतात. पण या जीवाच्या दातांमध्ये दुर्मीळ लोखंड धातू आढळून आला आहे. या दातांनी हा जीव दगड खातो. चला जाणून घेऊ या अनोख्या जीवाबाबत... अनेक जीव असे असतात ज्यांचे दात फारच टोकदार असतात. ते एकदाच त्या दातांनी शिकारीचा जीव घेऊ शकतात. अशात वैज्ञानिकांनी एक जीव शोधून काढलाय ज्याचे दात लोखंडाचे आहेत. सामान्यपणे दात कॅल्शिअमपासून तयार होतात. पण या जीवाच्या दातांमध्ये दुर्मीळ लोखंड धातू आढळून आला आहे. या दातांनी हा जीव दगड खातो. चला जाणून घेऊ या अनोख्या जीवाबाबत...
सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे हा जीव शिंपल्याच्या प्रजातीचा आहे. सामान्यपणे शिंपले फार मुलायम असतात. पण या जीवाचे दात त्याला मुलायम नाही तर कठोर बनवतात. या जीवाला लोक वॅंडरिंग मीटलोफ असं म्हणतात. वैज्ञानिक भाषेत याचं नाव क्रिप्टोशिटोन स्टेलेरी असं आहे. हा जीव सामान्यपणे दगडी किनाऱ्यांवर आढळून येतो. या जीवाचे दात आणि खाण्याची पद्धत पाहून वैज्ञानिकही हैराण झाले आहेत.
हा जीव एखाद्या मांसाच्या तुकड्यासारखा लाल दिसतो. वैज्ञानिकांना या जीवाच्या दातांमध्ये दुर्मीळ लोखंड अयस्क सॅंटाबारबराइट मिळालं आहे. या जीवाच्या शरीराचा आकार अंडाकृती असतो. वरच्या बाजूला कॅल्शिअमपासून तयार कवच असतं. याची जास्तीत जास्त लांबी १४ इंच असते.
इलिनॉय येथील नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीचे अभ्यासक आणि असोसिएट प्रोफेसर डर्क जॉस्टर यांनी सांगितलं की, वॅंडरिंग मीटलोफ दगड खातो. कोणत्याही दगडात हा जीव आपल्या दातांनी छिद्र पाडू शकतो. त्याच्या दातात आढळणारं लोखंड हे फारच दुर्मीळ आणि मजबूत आहे.
डर्क जॉस्टर यांनी सांगितलं की, सॅंटाबारबराइटमुळे वॅडरिंग मीटलोफच्या दातांना फार मजबूती मिळते. या जीवाला जायंट पॅसिफिक शिटोन आणि जाएंट गमबूट शिटोन असंही म्हटलं जातं.
डर्क म्हणाले की, शिटोन आपल्या कठोर दातांसाठी ओळखले जातात. शरीर नरम असतं. यांच्या जिभेला रेडुला असं म्हणतात. जी फार नरम आणि लवचिक असते. जेव्हा हे जीव दगडांवर आपलं जेवण शोधतात तेव्हा त्यांचे दात बाहेर येतात आणि जीभ आत हलत असते. दगडावरील इतर छोटे जीव ते खातात. इतकंच नाही तर ते दगडही खातात.