दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात का असतात २९ दिवस? असं झालं नाही तर काय होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:18 PM2020-02-25T13:18:00+5:302020-02-25T13:37:04+5:30

२०२० आधी २०१६ च्या फेब्रुवारीमध्ये लीप ईअर होतं आणि नंतर आता २०२४ मध्ये असेल.

सगळ्यांनाच नाही पण काही लोकांना हे माहीत असेल की, २०२० हे वर्ष एक 'लीप ईअर' आहे. म्हणजे यावर्षी फेब्रुवारीमध्ये २९ दिवस असतील. लीप ईअरमध्ये इतर वर्षांच्या तुलनेत एक दिवस जास्त असतो. पण हे असं का आणि कसं होतं हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या कॅलेंडरमध्ये दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्त का जोडला जातो? नसेल माहीत तर जाणून घ्या.

दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये २८ ऐवजी २९ दिवस असतात. सोबतच एकूण इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षात ३६५ नाही तर ३६६ दिवस असतात. २०२० आधी २०१६ च्या फेब्रुवारीमध्ये लीप ईअर होतं आणि नंतर आता २०२४ मध्ये असेल.

एक कॅलेंडर हे पृथ्वीच्या वातावरणानुसार असतं. तर एका कॅलेंडरमध्ये दिवसांची संख्या पृथ्वीद्वारे सूर्याची परिक्रमा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेनुसार असते.

पृथ्वीला सूर्याच्या चारही बाजूने एक चक्कर पूर्ण करण्यासाठी जवळपास ३६५.२४२ दिवसांचा वेळ लागतो. पण दरवर्षी सामान्यपणे ३६५ दिवस असतात. आता पृथ्वीने सूर्याला मारलेली अतिरिक्त ०.२४२ दिवसांची फेरी चार वेळा एकत्र केली गेली तर हा वेळएक दिवसाच्या बरोबरीत होतो. (Image Credit : kawarthanow.com)

त्यामुळे चार वर्षातून एकदा एक दिवस वाढतो आणि दर चार वर्षांनी एक दिवस अधिकचा जोडला जातो. यावर्षीही असंच लीप ईअर आहे.

तसं बघायला गेलं तर हे चुकीचं वाटू शकतं. पण ही चूक ग्रेगोरिअन कॅलेंडरच्या माध्यमातून सुधारण्यात आली. हे तेच कॅलेंडर आहे जे आज आपण आपल्या घरातील भिंतींवर लावतो किंवा मोबाइलमध्ये वापरतो. १५८२ मध्ये ग्रेगोरिअन कॅलेंडर सादर करण्यात आलं होतं.

ग्रोगेरिअनआधीही ज्यूलिअन कॅलेंडर होतं, ज्यावरून दिवस ठरत होते. हे कॅलेंडर इसपू ४५ मध्ये तयार केलं होतं. पण लीप ईअरसाठी एक वेगळं कॅलेंडर असायचं.

ज्यूलियन कॅलेंडरमध्ये पृथ्वीच्या परिक्रमेचा निश्चित वेळ माहीत नसल्याने यात काही त्रुटी होत्या.

१६व्या शतकात ज्यूलिअन कॅलेंडरमधील त्रुटी दूर बरोबर करण्यासाठी १५८२ मध्ये पोप ग्रेगरी XIII ने हा आदेश दिला होता की, त्यावर्षी ४ ऑक्टोबरनंतर थेट १५ ऑक्टोबर तारीख येईल. अशाप्रकारे चूक सुधारण्यात आली. ही नवीन प्रणाली ग्रेगोरिअन कॅलेंडरच्या रूपात ओळखली जाऊ लागली.

आता लीप ईअर कसं ओळखायचं यासाठी काही नियम असतात. त्यातील एक म्हणजे ते वर्ष चारने भागायचं. जसे की, २००० ला ४ ने भागलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे २००४, २००८, २०१२, २०१६ आणि आता हे २०२० याच क्रमात आहेत.