जीन्सला का असतो लहानसा खिसा? तुम्हाला माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 02:55 PM2020-03-06T14:55:57+5:302020-03-06T15:03:44+5:30

जीन्स टीशर्ट, जीन्स शर्ट हा अनेकांचा आवडता पेहराव. कॉलेजमध्ये असताना तर अनेकजण दररोज जीन्सच घालतात. मात्र जीन्सच्या पुढच्या भागात उजव्या बाजूला असलेल्या खिशाच्या वर असलेला एक लहानसा खिसा नेमका का देण्यात आलाय, याची अनेकांना कल्पना नसते.

बाजूलाच इतका मोठा खिसा असताना वर लहानसा खिसा का देण्यात आला आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

जीन्सच्या मोठ्या खिशात रुमाल, चावी अगदी आरामात ठेवता येते. मग त्याखाली असलेल्या छोट्या खिसाचा नेमका उपयोग काय?

जीन्सला देण्यात आलेला लहानसा खिसा सुट्टे पैसे ठेवण्यासाठी असावा, असं अनेकांना वाटतं. मात्र त्या खिशाचा आकार आणि रचना पाहता, त्यातून सुट्टे पैसे चांगलीच त्रेधा उडेल.

जीन्सचा तो लहानसा खिसा सुट्टे पैसे किंवा तिकीट ठेवण्यासाठी असावा असा अनेकांचा समज आहे. मात्र तसं नाहीए बरं.

जीन्समध्ये उजव्या बाजूला देण्यात आलेला लहानसा खिसा घड्याळ ठेवण्यासाठी देण्यात आलाय, असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल.

लेवी स्ट्रॉसनं अँड कंपनीनं १८७९ मध्ये पहिल्यांदा जीन्स तयार केली. त्यावेळी त्यात उजव्या बाजूला पुढे लहानसा खिसा देण्यात आला.

खाण कामगार, सुतारकाम करणारे कारागीर, रेल्वे प्रकल्पांवरील मजूर यांच्या गरजा लक्षात घेऊन लेवी स्ट्रॉसनं अँड कंपनीनं जीन्स तयार केली. त्यामुळेच तिच्यासाठी अतिशय जाड कापड वापरण्यात आलं. कोणत्याही परिस्थितीत फाटू नये हा त्यामागचा विचार होता.

कष्टाची कामं करणाऱ्या मजुरांना घड्याळ ठेवता यावं यासाठी जीन्सच्या पुढे उजव्या बाजूला छोटा खिसा देण्यात आला होता.

पुढे परिस्थिती बदलली. घड्याळ हातात घालता येऊ लागलं. मात्र जीन्सच्या पुढच्या भागात असलेला लहान खिसा कायम राहिला.