मद्य की अमृत..? एक बॉटेल व्हिस्कीची किंमत तब्बल 6.5 कोटी रुपये; घेणाऱ्यांची लाईन...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 09:56 PM2022-10-07T21:56:02+5:302022-10-07T22:09:21+5:30

Yamazaki-55: जपानमध्ये तयार होणाऱ्या एका मद्याची कोट्यवधीमध्ये किंमत आहे. यात नेमकं आहे तरी काय..?

Yamazaki-55: मद्याच्य एका बाटलीची किंमत किती असू शकते? 1 हजार, 10 हजार, 1 लाख 10 लाख...? तुम्हाला सांगितलं की, एका मद्याच्या बाटलीची किंमत 6.5 कोटी आहे, तर...? विश्वास बसणार नाही, पण हे खरंच आहे. यापेक्षा जास्त आश्चर्याची बाब म्हणजे, ही महागडी आणि दुर्मिळ व्हिस्की घेण्यासाठी लोक बोली लावतात. आम्ही ज्या दारुबाबत बोलत आहोत, ती जपानी व्हिस्की "यामाझाकी-55"(Yamazaki-55) आहे.

या व्हिस्कीच्या नावासोबत जोडलेला 55 चा अर्थ असा आहे की, या व्हिस्कीला तयार करण्यासाठी 55 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लागला आहे. Yamazaki-55 ही जपानमध्ये तयार होणारी सर्वात जुनी आणि महागडी व्हिस्की आहे. जगातील सर्वात महागड्या कलाकृती, दागिने आणि लक्झरी वस्तूंचा लिलाव करणार्‍या Sotheby's च्या वेबसाइटनुसार, एका लिलावात यामाझाकीच्या 750 मिली बाटलीसाठी कमाल बोली $ 780,000 किंवा सुमारे 6.5 कोटी रुपये लागली होती.

फोर्ब्सच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखानुसार, या व्हिस्कीची रिटेल बेस प्राइस अंदाजे $60,000 म्हणजेच सुमारे 49 लाख रुपये आहे. बीम सनटोरी(Beam Suntory) नावाच्या कंपनीत ही महागडी व्हिस्की तयार केली जाते. ही व्हिस्की 2020 मध्ये प्रथमच लाँच करण्यात आली. त्यावेळी लॉटरी पद्धतीने जपानच्या बाजारपेठेत त्याच्या केवळ 100 बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

2021 मध्ये उर्वरित जगासाठी आणखी 100 बाटल्यांचे उत्पादन करण्यात आले. ही व्हिस्की काही महागड्या सिंगल माल्टपासून बनवली जाते. ते महाग असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, जगात अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. या व्हिस्कीमध्ये असे काय आहे, ज्यामुळे लोक करोडो रुपये खर्च करण्यास तयार आहेत.

ही व्हिस्की जपानमधील सर्वात जुनी ब्रुअरी, सनटोरीच्या यामाझाकी डिस्टिलरीमध्ये तयार केली जाते. व्हिस्की तयार करण्यासाठी, ती वर्षानुवर्षे डब्यात साठवली जाते. या प्रक्रियेला एजिंग म्हणतात. व्हिस्कीची चव, रंग आणि टेक्सचरसाठी डबा महत्त्वाची भूमिका बजावतो. Yamazaki-55 हे एका विशिष्ट प्रकारच्या पिशव्यामध्ये साठवली जाते.

याला Mizunara Casks म्हणतात. हे मिझुनारा झाडाच्या लाकडापासून बनवले जाते. हे लाकूड अत्यंत दुर्मिळ आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मिझुनारा कास्क तयार करण्यासाठी झाड किमान 200 वर्षे जुने असणे आवश्यक आहे. मिझुनाराचं लाकूड इतकं खास आहे की त्यात अनेक वर्षं वाईन ठेवल्यानंतर त्याची चव सर्वसामान्य अमेरिकन लाकडापासून तयार केलेल्या डब्यात ठेवलेल्या वाईनपेक्षा पूर्णपणे वेगळी असते.

मिझुनारा दारूची पहिली खेप 1960 मध्ये सुरू झाली. त्याच्या उत्पादकांनी ते इतक्या मर्यादित प्रमाणात तयार केले आणि विकले की त्याचे मूल्य स्वतःहून खूप वाढले. यामाझाकी-55, दुर्मिळ चंदनाच्या सुगंधासाठी आणि मिझुनारा कास्कपासून मिळणार्‍या फ्रूटी गोड आणि स्मोकी फ्लेवर्ससाठी वाईन प्रेमींना आवडते.

याव्यतिरिक्त, ज्या कंपनीने हे उत्पादन केले आहे, त्या कंपनीचा ऐतिहासिक वारसादेखील आहे. या व्हिस्कीची बाटलीही एका विशिष्ट प्रकारच्या बॉक्समध्ये येते. हा बॉक्स जपानी मिझुनारा लाकडापासून बनवला जातो. जपानी लॅकर तंत्राचा वापर करून बॉक्सला काळ्या रंगात रंगवले जाते, ज्यामुळे त्याला पूर्णपणे भिन्न चमक मिळते.

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे संस्थापक शिंजिरो तोरी आणि त्यांचा मुलगा केइझो साझी यांनी मिळून या दुर्मिळ व्हिस्कीला जन्म दिला. जगातील सर्वोत्तम व्हिस्की बनवणाऱ्या देशांमध्ये स्कॉटलंडनंतर आता जपानचेही नाव मोठ्या आदराने घेतले जाते. जगभरातील लोक आता स्कॉचनंतर जपानी व्हिस्कीला प्राधान्य देऊ लागले आहेत.

जपानी व्हिस्की स्कॉचचा प्रकार आहे, आणि याला तयार करण्यासाठी लागणारे अनेक घटक स्कॉटलंडमधून आणले जातात. पण, जपानमध्ये बनवलेल्या व्हिस्कीला जास्त मागणी असण्याचे एक कारण म्हणजे, ती अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. Yamazaki-12 भारतीय बाजारात सहज उपलब्ध आहे, ज्याची किंमत 10-15 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.