डिलिव्हरी बॉयने 15 मिनिटांत पोहोचवला चहा; 73,000 रुपयांचे मिळाले गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:18 PM2021-06-21T12:18:03+5:302021-06-21T12:24:07+5:30

zomato delivery boy : रॉबिन यांनी मोहम्मद अकीलचे फोटो शेअर करत फूड अँड ट्रॅव्हल फेसबुक पेजवर संपूर्ण त्याची स्टोरी लिहिली.

हैदराबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला सुपरफास्ट डिलिव्हरीसाठी एक अनोखी भेट दिली आहे.

दरम्यान, हैदराबादच्या कोटी भागात राहणारा रॉबिन मुकेश हे आयटी क्षेत्रात काम करतात. सध्या त्यांचे कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. सकाळी १० च्या सुमारास त्यांनी फूड डिलिव्हरी अ‍ॅप झोमॅटोवरून चहा मागवला होता आणि त्याचवेळी जोरदार पाऊस पडत होता.

'माझा ऑफिसचा टाइम सुरू झाला आणि मी झोमॅटोवरून चहा मागवला. त्यावेळी मी पाहिले की, मोहम्मद अकील नावाचा एक डिलिव्हरी बॉय मेहदीपट्टनममध्ये उपस्थित होता. त्यानंतर मला पुढच्या 15 मिनिटांत या डिलिव्हरी बॉयचा कॉल आला होता', असे रॉबिन यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मोहम्मद अकील नावाच्या डिलिव्हरी बॉयने मला माझ्या अपार्टमेंटच्या खाली बोलावले. मी पाहिले की हा व्यक्ती पावसामुळे पूर्णपणे भिजला होता. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे तो केवळ 15 मिनिटांत दुचाकीवरून इतक्या अंतरावर पोहोचला.

'जेव्हा मी त्याला विचारले की सायकलवर इतक्या वेगाने ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी कसा पोहोचला? तेव्हा त्याने सांगितले की, गेल्या एका वर्षापासून तो सायकलवर ऑर्डर देत आहे. त्याच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे मी प्रभावित झालो आणि मी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला', असे रॉबिन यांनी सांगितले.

त्यानंतर रॉबिन यांनी मोहम्मद अकीलला विचारून फोटो काढला. अकील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे रॉबिन यांना समजले. त्यानंतर रॉबिन यांनी मोहम्मद अकीलचे फोटो शेअर करत फूड अँड ट्रॅव्हल फेसबुक पेजवर संपूर्ण त्याची स्टोरी लिहिली.

यानंतर ही पोस्ट जोरदार व्हायरल होऊ लागली आणि बर्‍याच लोकांचे मेसेजेस येऊ लागले. बर्‍याच लोकांनी असेही सांगितले की त्यांना मोहम्मद अकीलला मदत करायची आहे. ज्यावेळी मोहम्मद अकीलला यासंदर्भात विचारले असता तो म्हणाला की, त्याला मोटारसायकल मिळाली तर ती मोठी मदत ठरेल.

दरम्यान, मोहम्मद अकीलचे वडील चप्पल तयार करण्याचे काम करतात, परंतु कोरोनामुळे त्यांचे काम बंद आहे. यामुळे 21 वर्षांच्या अकीलला घराची जबाबदारी सांभाळावी लागते. अकील म्हणाला की, तो दररोज सायकलवरून सुमारे 80 किलोमीटरचा प्रवास करतो आणि दिवसाला 20 ऑर्डर पोहोचवतो.

रॉबिन यांनी सांगितले की, मोहम्मद अकीलसाठी निधी जमा करण्यास सुरूवात केली आणि पाहता-पाहता त्याच्यासाठी 73000 रुपये जमा झाले. यामध्ये अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने 30 हजार रुपयांची देणगी दिली होती.

रॉबिन म्हणाले की, माझी पोस्ट इतकी व्हायरल होत होती की त्यावर बरीच देणगी येत होती, त्यामुळे ती बंद केली आणि मोहम्मद अकीलसाठी एक टीव्हीएस एक्सएल बाईक खरेदी केली. याशिवाय, सॅनिटायझर्स आणि हेल्मेट यासारख्या अत्यावश्यक गोष्टीही त्याला कोरोना काळात पुरविल्या. तसेच, उर्वरित पाच हजारांचा उपयोग त्याच्या महाविद्यालयाच्या फीसाठी करण्यात आला.