Photos: शाहूनगरी 100 सेकंदांसाठी स्तब्ध, छत्रपतींना चोहीकडून मानवंदना By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:39 PM 2022-05-06T17:39:50+5:30 2022-05-06T18:00:20+5:30
कुणी शेतातील वावरात, विद्यार्थी शाळेत, कुणी रस्त्यावर तर धावत्या लाल परीतही शिव-शाहूप्रेमी १०० सेकंद स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं. या सन्मान वंदनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरभाष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुरभाष्य प्रणालीद्वारे पुणे येथून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराज होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इतिहास सांगितला.
प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो. आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं.
ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. छत्रपती शाहू महाराज हे महामानव होते. महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी शाहू महाराजांचे निधन झाले.
"बहुजन हिताय बहुजन सुखाय" हा विचार देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता १०० सेकंद अवघं कोल्हापूर स्तब्ध झालं.
नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्धता पाळत शाहूरायांना मानवंदना दिली. ग्रामीण भागातही शेतकरी बांधवांनी वावरातच १०० सेकंद स्तब्धता पाळत आदराजंली वाहिली.
कोल्हापुरातील शाहू मिल येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ जिल्ह्यातून अनेकजण एकत्र जमले होते. या सर्वांना सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना मानवंदना दिली. अगदी पालकमंत्र्यांपासून ते कामगारांपर्यंत सर्वचजण स्तब्ध झाले होते.
कुणी शेतातील वावरात, विद्यार्थी शाळेत, कुणी रस्त्यावर तर धावत्या लाल परीतही शिव-शाहूप्रेमी १०० सेकंद स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं. या सन्मान वंदनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, सावर्डे गावात मेंढपाळ यांनीही शेतातूनच स्तब्धता पाळत लोकराजाला आदरांजली वाहिली. हा मनाला भावणारा फोटो लोकमतचे प्रतिनिधी संतोष कुंभार यांनी टिपला आहे.
तर थेट शेतात काम करताना शेतकरी बांधवांनीही आपल्या राजाला मानवंदना दिली. आजही शाहूराजाबद्दल नागरिकांच्या मनात असलेली कृतज्ञता यावरुन दिसून येते. समस्त कोल्हापूरकरांनी आपल्या राजासाठी १०० सेकंद स्तब्धता पाळत मानवंदना दिली.