ट्रम्पनी पाठवून दिलेल्या विमानात महाराष्ट्रातील तिघे; बेड्या घालून बसविले, ३५ तासांचा प्रवास अन् एकच टॉयलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:18 IST2025-02-05T17:07:00+5:302025-02-05T17:18:13+5:30

अवैधरित्या राहत असलेल्या भारतीयांना परत भारतात आणण्यासाठी अमेरिकेला भारत सरकारची मंजुरी आवश्यक होती. भारतही घुसखोरीचा सामना करत आहे.

अमेरिकेतील घुसखोरांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठविण्यास अमेरिकेतील ट्रम्प सरकारने सुरुवात केली आहे. अमेरिकेत १८ हजारहून अधिक भारतीय अवैधरित्या राहत असल्याचा आकडा आहे. यापैकी पहिल्या १०४ लोकांना भारतात पाठवून देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. या सर्व लोकांना हातकड्या घालून विमानात बसविण्यात आले होते. एखाद्या कैद्याप्रमाणे ३४ तास या लोकांना प्रवास करावा लागला आहे.

मंगळवारी पहाटे तीन वाजता अमेरिकेच्या अंटोनिओ लष्करी तळावरून विमानाने भारताकडे उड्डाण केले होते.हे लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरले आहे. या विमानामध्ये हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३, पंजाबचे ३० आणि महाराष्ट्राचे तीन जण आहेत. तसेच उत्तर प्रदेश-चंदीगढचे प्रत्येकी दोन लोक आहेत. यामध्ये काही नवरा-बायको-मुले असे कुटुंबही आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार पंजाब, हरियाणाच्या लोकांना रस्ते मार्गानेच त्याच्या घरी पाठविले जाणार आहे. तर गुजरात, महाराष्ट्र व युपीच्या लोकांना विमानाने पुढे पाठवून दिले जाणार आहे. अमेरिकेने २०५ लोकांना भारतात पाठविण्यासाठी तयारी केली होती. परंतू पहिले १०४ जण आले आहेत.

अमेरिकेने १५ लाख अनधिकृत प्रवाशांची यादी बनविली आहे. जे अमेरिकेत या ना त्या मार्गाने घुसलेले आहेत. या लोकांमुळे अमेरिकेचा प्रचंड पैसा वाया जातो, तसेच मूळ अमेरिकन नागरिकांचा हक्क डावलला जातो असा ट्रम्प यांचा आरोप आहे. यामध्ये १८ हजार भारतीय आहेत.सर्वात आधी वाईट लोकांना बाहेर काढणार असल्याचे ट्रम्पनी निवडणुकीत म्हटले होते.

अवैधरित्या राहत असलेल्या भारतीयांना परत भारतात आणण्यासाठी अमेरिकेला भारत सरकारची मंजुरी आवश्यक होती. भारतही घुसखोरीचा सामना करत आहे. ट्रम्प यांनी ही मोहिम सुरु केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चर्चा केली होती. तेव्हा आम्ही त्या लोकांना परत भारतात घेण्यास तयार असल्याचे जयशंकर यांनी कळविले होते.

प्यू रिसर्च सेंटरच्या २०२२ च्या अहवालानुसार, अमेरिकेत सुमारे ७.२५ लाख बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित राहतात. ही संख्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकाची आहे. सध्या जो आकडा आहे तो १८ हजार एवढा आहे. म्हणजेच सध्या अमेरिकन प्रशासनाला या १८ हजार जणांची माहिती आहे. उर्वरित लोकांची माहिती यानंतर गोळा केली जाण्याची शक्यता आहे.

या प्रवाशांना त्यांच्या देशात नेऊन सोडण्याचा खर्च अमेरिकाच उचलत आहे. अवाढव्य असलेली मिलिट्री प्लेनचा वापर यासाठी केला जात आहे. चार्टर्ड फ्लाईटच्या तुलनेत हा पाच ते सहा पटींनी जास्त आहे. टेक्सास ते ग्वाटेमालाला पाठविलेल्या विमानाचा एका प्रवाशामागे 4 लाख रुपए खर्च आला होता. विमानाचे तिकीट ७४ हजार रुपये होते.

भारतात पाठविलेल्या लोकांना बेड्या घालण्यात आल्या होत्या. विमानात फक्त एकच टॉयलेट होते. या लोकांना अशा स्थितीत ३५ तास प्रवास करावा लागला आहे. या लोकांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली आहे.