15 days 24 hours...How does Raj thackeray's MNS Toll Monitoring War Room work?
१५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसेच्या टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं? By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 01:19 PM2023-10-20T13:19:17+5:302023-10-20T13:30:12+5:30Join usJoin usNext टोलदरवाढीवरून मनसेने ठाण्यात उपोषणाला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा राज्यात टोलचा मुद्दा ऐरणीवर आला. टोलच्या विषयात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटली. त्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री दादा भुसे आणि शासकीय अधिकारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठकीला पोहचले. राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीतून अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात महत्त्वाचा म्हणजे टोलनाक्यांवर किती वाहने दिवसाला जातात, त्यातून किती टोल वसूल होतो, त्याबाबत सरकार आणि मनसेकडून व्हिडिओग्राफी करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आता मनसेने मुंबई एन्ट्री पाँईटवरील टोलवर सीसीटीव्ही लावले आहेत. मुंबईच्या वाशी येथील टोलनाक्यावर नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून CCTV लावण्यात आलेत. तसेच ठाण्यातील टोलनाक्यांवर अविनाश जाधव यांच्याकडून कॅमेरे बसविण्यात आलेत. नवी मुंबईत मनसेच्या कार्यालयात टोल मॉनेटरिंग वॉर रुम बनवण्यात आली आहे. याबाबत बाळा नांदगावकर म्हणाले, टोल विषय मनसेसाठी नवीन नाही, खऱ्या अर्थाने त्याचे वास्तव लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. सरकारला जागृत करणे आवश्यक आहे. आता लोकांना फसवता येणार नाही. किती वर्ष टोल घ्यायचे याला मर्यादा आहे. मुंबईतून बाहेर पडणारे, आत येणाऱ्या वाशी, ऐरोली इथं टोलनाक्याला कॅमेरा लावलेत. मुलुंडला अविनाश जाधवने लावले आहेत. त्यातून सरकारला या यंत्रणेचा फायदा होणार आहे असं त्यांनी म्हटलं. मुंबईतील ५ टोलनाक्यांपैकी महत्त्वाचा असलेला वाशी टोलवरून लाखो वाहने ये-जा करत असतात. तिथे किती वाहने दिवसाला प्रवास करतात याची नोंद घेण्यासाठी मनसेने कॅमेरे लावले आहेत. त्याचे मॉनेटरिंग करण्यासाठी सीवूड येथे वॉर रुम उभारण्यात आली आहे. टोलनाक्यावरील प्रत्येक मार्गिकेवरून किती वाहने जातात, किती वाहने मुंबईत येतात त्यावर कॅमेरा बसवण्यात आला आहे. तांत्रिकरित्या या वाहनांची नोंद मनसे कार्यालयात होत आहे. पुढील १५ दिवस २४ तास मनसे कार्यकर्ते यावर देखरेख ठेवणार आहे. टोल कंपन्या वाहनांची संख्या कमी दाखवत असते, त्यामुळे टोलबाबत सरकारला योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे मनसेने यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे दिवसाला किती वाहने या मार्गावरून जातात त्याची नोंद मनसे कार्यकर्ते ठेवत आहेत. याबाबत मनसेचे शहर सचिव सचिन कदम यांनी सांगितले की, ११-१२ वर्षापूर्वी मनसेने या टोलनाक्यावर आंदोलन केले होते. तिथे टोलनाक्यावर बसून नोंदणी केली होती. टोल प्रशासन विश्वासार्ह डेटा सरकारला देत असतील यावर मनसेचा विश्वास नाही. त्यामुळे किती टोल वसूल होतोय याची माहिती नाही. त्यामुळे टोलनाके बंद करायलाही सरकार असमर्थता दाखवते हे दिसून येते. त्यासाठी मनसेकडून मोजणी सुरू आहे असं त्यांनी सांगितले. वाशी टोल नाक्यावर एकूण १२ मार्गिका आहेत, तिथे १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. वॉर रुममध्ये मनसेचे १२ कार्यकर्ते दररोज याठिकाणी वाहनांच्या संख्येची मोजणी करतील. पुढील १५ दिवस २४ तास ही पाहणी करणार आहेत. १५ दिवसानंतर मनसेकडून एक डेटा बनवण्यात येईल. त्यानंतर हा डेटा राज्य सरकारला आणि गरज भासल्यास कोर्टातही सादर करेल. काही वर्षापूर्वी मनसेने टोलनाक्यावर बसून वहीत हा डेटा बनवला होता. परंतु त्याला तांत्रिक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नव्हता. त्यामुळे आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा डेटा तयार होईल आणि तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल अशी मनसेला आशा आहे. टॅग्स :मनसेटोलनाकाराज ठाकरेMNStollplazaRaj Thackeray