3 options before Eknath Shinde to save government Says MNS leader Prakash Mahajan
आमदारकी वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंसमोर ३ पर्याय; महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 04:06 PM2022-07-28T16:06:30+5:302022-07-28T16:10:11+5:30Join usJoin usNext शिवसेनेत बंड पुकारत एकनाथ शिंदे आणि समर्थक ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान निर्माण केले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील मविआ सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत येऊन सरकार स्थापन केले. विधानसभेत १६३ सदस्यांचं बहुमत असल्याचं शिंदे सरकारनं सिद्ध केले. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधी होऊनही एक महिना झाला मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती त्यावरून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी खंडपीठ नेमले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मुख्यमंत्र्यांसह १५ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यात पक्षांतर बंदी घटनेच्या १० व्या तरतुदीनुसार शिंदे गटातील समर्थकांना आमदारकी वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल असा दावा करण्यात येत आहे. मात्र आम्ही शिवसेनेचा आहोत असा प्रतिदावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. कोर्टाचा निकाल येईपर्यंत सर्वकाही अधांतरीच आहे. मात्र त्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिंदे गटासमोर सध्या ३ पर्यायच उपलब्ध असल्याचं सांगितले आहे. त्यात तिसरा पर्यात सर्वोत्तम असल्याचं म्हटलं आहे. प्रकाश महाजनांनी सांगितल्यानुसार, पहिला पर्याय म्हणजे शिंदे गट स्वतंत्र्य अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे भाजपासोबत असलेली बार्गेनिंग पॉवर तेवढीच राहील. यातील कुणीही पक्ष सोडल्याची भाषा केली नाही म्हणून ते शिवसेना म्हणूनच राहू शकतील. शिंदे गटासमोर दुसरा पर्याय म्हणजे त्यांना भाजपात विलीन व्हावं लागेल. परंतु भाजपाच्या समुद्रात तुमचं तांब्याभर पाणी टाकल्यासारखं आहे. मग तुम्हाला स्वातंत्र्य अस्तित्व राहणार नाही. हे ओळखण्या इतपत एकनाथ शिंदे चाणक्ष्य आहेत असं महाजनांनी म्हटलं. तर तिसरा पर्याय म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची वेळ आली तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना. याचं कारण ठाकरे नाव येईल, हिंदुत्वाची प्रखर भूमिका आहे. राज ठाकरेंसारखा लोकप्रिय नेता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात चांगले संबंध आहेत. कारण ठाण्यातील स्थानिक पातळीवरील अनेकदा त्यांनी एकमेकांना मदत केली आहे. त्याचसोबत राज ठाकरेंनीही जर असा प्रस्ताव आला तर विचार करेन असंही म्हटलं असल्याचं प्रकाश महाजनांनी सांगितले. दरम्यान, सुप्रीम कोर्टात १६ आमदारांना अपात्र ठरवले जाईल. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावला आहे. शिंदे गटातील दुसऱ्या पक्षात जायला किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची कल्पना आम्हाला आहे. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही असा मोठा दावाही शिवसेनेने केला आहे.टॅग्स :मनसेएकनाथ शिंदेभाजपासर्वोच्च न्यायालयMNSEknath ShindeBJPSupreme Court