Coronavirus: महाराष्ट्रावर उभं राहिलंय कोरोनाचं नवं संकट; ‘या’३ जिल्ह्यांनी वाढवलं सरकारचं टेन्शन By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 05:23 PM 2021-06-20T17:23:35+5:30 2021-06-20T17:29:41+5:30
Third wave of Corona: भारतात कोरोनाची दुसरी लाट शमत नाही तोवरच कोरोनानं पुन्हा रुप बदलून नवं संकट उभं केले आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच आता महाराष्ट्रासाठी आणखी चिंता वाढवणारी बातमी आली आहे. महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी SARS Cov2 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ७ रुग्ण आढळले आहेत.
त्याचसोबत अन्य किती ठिकाणी नवा व्हेरिएंट्स पसरला आहे. त्यासाठी आणखी नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील तज्ज्ञांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर, त्याशिवाय सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सांगलीत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी पुन्हा वाढत असल्याचं समोर आलं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट्सच्या ७ रुग्णांपैकी ५ रुग्ण एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आहेत. महाराष्ट्रात ३ जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट्सचे रुग्ण आढळले आहेत. यात रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या गावातील ५ रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट्स आढळला आहे. त्या गावाला पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. याठिकाणी कन्टेन्मेट झोन तयार करण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे या ५ रुग्णांपैकी २ रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती.
डेल्टा प्लस व्हेरिएंट(Delta Plus Variant) हा डेल्टा व्हेरिएंट म्यूटेशन आहे. म्हणजे डेल्टा व्हेरिएंटचं म्यूटेट होऊन डेल्टा प्लस व्हेरिएंट बनला आहे. हा B.1.617.2 स्ट्रेनच्या म्यूटेशनपासून बनला आहे. म्यूटेशनचं नाव K417N असं आहे.
कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये म्हणजे जुन्या व्हेरिएंटमध्ये थोडा बदल झाल्यामुळे नवा व्हेरिएंट सगळ्यांसमोर आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक लोक डेल्टा व्हेरिएंट(Delta Variant) चे शिकार झाले होते.
कोरोना प्रत्येकवेळी स्वत:चं रुप बदलून येत आहे. याच गोष्टीमुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट नागरिकांसाठी अधिक धोकादायक बनत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्हायरसच्या म्यूटेशनने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे.
परंतु नीती आयोगाच्या डेटानुसार मार्चपासूनच कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतात असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या टास्कफोर्सनं एक अथवा दोन महिन्याच्या आत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. शरीरातील ऑक्सिजन पातळी अचानक कमी होत असल्याने अनेकांचे जीव गेले होते. यातच आता डेल्टा प्लस व्हेरिएंट महाराष्ट्रात आढळल्याने कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ज्या गावात डेल्टा प्लस व्हेरिएंट्सचे रुग्ण आढळले त्या गावातील लोक नेहमी परदेशात येऊन जात असतात. परंतु या ५ रुग्णांनी कोणताही परदेश दौरा केला नसल्याचं सांगितले आहे. १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यात पॉझिटिव्ही रेट १३.८ टक्के इतका होता. त्यावेळी राज्यात पॉझिटिव्हीटी रेट ५.८ टक्के होता. रत्नागिरीत कोरोनाचे ६ हजार ५५३ सक्रीय रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा उल्लेख महाराष्ट्रातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यामध्ये होतो.